फलटण तालुका रब्बीचा; शेतकऱ्यांचा कल खरिपाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:21+5:302021-06-09T04:48:21+5:30
आदर्की : शासन दप्तरी फलटण तालुका रब्बीचा असला तरी बदलले हवामान व धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे शेतकरी रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात ...
आदर्की : शासन दप्तरी फलटण तालुका रब्बीचा असला तरी बदलले हवामान व धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे शेतकरी रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरण्या करून उत्पादन वाढवत आहेत. त्यामुळे फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात आहेत.
फलटण तालुक्याची शासन दरबारी रब्बीचा तालुका म्हणून नोंद असल्याने तालुकास्तरावर रब्बी हंगामाच्या नियोजित बैठका होत असतात; पण तालुक्याच्या पश्चिम भागात धोम-बलकवडीचे पाणी व हवामानातील बदल यामुळे शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात बागायत शेती करण्याकडे कल असला तरी उन्हाळी पिके खर्चीक असल्याने मोठे भांडवलदार शेतकरी उन्हाळी पिके घेतात. परंतु खरीप हंगामाच्या तयारीसाठी उन्हाळ्यात नांगरट, फणपाळी, शेणखत टाकून कुळवाची पाळी टाकली जाते.
खरीप हंगामात बाजरी मुख्य पीक होते, तर त्यामध्ये आंतरपीक मूग, घेवडा, चवळीची पिके शेतकरी घेत होते. पण धोम-बलकवडीचे पाणी व गत पाच-सहा वर्षांपासून हवामानात बदल होऊ लागले. तसेच बाजरीचे संकरित बियाणे आल्यामुळे कमी क्षेत्रात जादा उत्पादन मिळू लागल्याने मूग, चवळीबरोबर काळा घेवडा, वरुण घेवडा, वाघा घेवडा, सोयाबीन, धना पिके जादा प्रमाणात घेतली जात आहेत. बाजरीपेक्षा मूग, घेवडा, सोयाबीन, धना पिकांना पाणी कमी लागत असते तर रिमझिम पावसावर वाढ चांगली होते. कमी कष्टात समाधानकारक उत्पादन मिळते व त्याला लोणंद, फलटण, वाठार स्टेशन या बाजारपेठा जवळ उपलब्घ असल्याने खरीप हंगामातील पिकाकडे शेतकरी वळला आहे. खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागत पूर्णत्वाकडे असून, पेरणीसाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
फलटण पश्चिम भागात मान्सूनचा रिमझिम पाऊस पडतो. त्यामुळे वाघा घेवडा, सोयाबीन क्षेत्रात वाढ झाली. पिकेही चांगले येत आहे; पण बियाणे प्रक्रिया, पेरणी, खते, औषध व काढणी यांचे मार्गदर्शन कृषी विभागाने केल्यास जादा उत्पादन मिळणार आहे.
फोटो
०८आदर्की
आदर्की परिसरात खरीप हंगाम पेरणीपूर्व मशागत बैलजोडीच्या मदतीने केली जाते. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)