मराठा आरक्षणासाठी फलटणला मोर्चा
By admin | Published: November 20, 2014 09:58 PM2014-11-20T21:58:29+5:302014-11-21T00:29:15+5:30
मराठा सेवा संघ, जिजाऊ, संभाजी ब्रिगेड, शिवसंग्रामचा पुढाकार
फलटण : मराठा आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती विरोधात ‘भाजप’ने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे. दिवंगत गोपीनाथ मुंढे यांनी मराठा आरक्षणाचे दिलेले वचन भाजप शासनाने पूर्ण करावे आदी मागण्यांसाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ, संभाजी ब्रिगेड, शिवसंग्राम संघटनांतर्फे फलटण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. त्यानंतर नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांना निवेदन दिले. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. त्याठिकाणी मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब पवार, तालुकाध्यक्ष स. रा. मोहिते, जिजाऊ ब्रिगेडच्या शारदा पवार, संभाजी ब्रिगेडचे विशाल शिंदे, शिवसंग्रामचे ठाणे जिल्हाध्यक्ष विलास आग्रे, भाजपचे सुशांत निंबाळकर, सुनील सस्ते यांची भाषणे झाली.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासाठी तत्कालीन आघाडी सरकारमधील माजी मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाल दिल्यानंतर आघाडी सरकारने मराठा व मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, उच्च न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने या आरक्षणास स्थगिती दिली आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बेताची असल्यानेच ही मागणी करण्यात आली होती. ‘भाजप’ सत्तेत येण्यापूर्वी आरक्षण रद्द करण्याची भाषा करत होते. सत्तेत आल्यानंतर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर मराठा समाजात शासनाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. शासनाने आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडली नाही. शिवाय तीन तज्ज्ञ सचिवांच्या बदल्या केल्या. याचा परिपाक म्हणजे उच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. सर्वपक्षीय मराठा आमदारांनी यांचा विचार करून हिवाळी अधिवेशनात याबाबत सकारात्मक विचार करावा. (प्रतिनिधी)