संकटकाळी फलटणकर आश्रय देतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 10:47 PM2017-11-12T22:47:18+5:302017-11-12T22:53:50+5:30
फलटण : ‘फलटणकर नेहमीच सहिष्णुता आणि मदतीसाठी आघाडीवर राहिल्याचे नमूद करीत ब्र्रिटिशाविरुद्ध भूमिका घेतल्याने आपल्या कुटुंबातील पूर्वजांना याच जिल्ह्यातील नांदवळ येथून हद्दपार व्हावे लागले. त्यावेळी ती मंडळी फलटण येथे वास्तव्यास आली आणि त्यानंतर त्यांनी काट्याचीवाडी (बारामती) येथे वास्तव्य केले. ही वस्तुस्थिती असल्याचे स्पष्ट करीत संकटाच्या काळात येथे आश्रय मिळतो, हे विसरता येणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केले.
येथील आबासाहेब मंदिर, चक्रपाणी जन्मस्थान आणि रंगशिळा मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर या तिन्ही मंदिरांचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, डॉ. इंद्रजित मोहिते, सुभाषराव शिंदे, डॉ. विजयराव बोरावके, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यासह महानुभाव पंथातील अनेक संत, महंत विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
खासदार शरद पवार म्हणाले, ‘आडनावावरून जात आणि धर्म किंवा पंथ स्पष्ट होत असल्याने महानुभाव पंथामध्ये संत महंतांची नावे गावावरून येत. येथे जात, धर्म, पंथ पूर्णपणे बाजूला ठेवून सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा आणि त्यांच्यामध्ये समाजाविषयी आदर आणि आपुलकीची शिकवण देणारा धर्म म्हणून महानुभाव पंथाची ओळख आहे.
शिकवणुकीची गरज
गाडगे महाराजांनी म्हटले आहे की, देव सुंदर मूर्तीत असल्याचे पाहून त्याला नमस्कार करता; परंतु तो नैवेद्य खात नाही, हालचाल करीत नाही, वस्त्र परिधान करीत नाही, अशा देवाला पूजण्यापेक्षा ज्याला अन्न, वस्त्र, निवाºयाची गरज आहे, त्याला ते उपलब्ध करून द्या आणि माणसातील दैवत्व जागे करून त्याची पूजा करा त्यातून समाजमन तयार होईल, याची शिकवण दिल्याचे निदर्शनास आणून देत आज खºया अर्थाने या शिकवणुकीची गरज आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.