वाढत्या गुन्हेगारीमुळे फलटणकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:06 AM2021-02-05T09:06:31+5:302021-02-05T09:06:31+5:30
फलटण : फलटण नगरपरिषद हद्दीत मलटण परिसरातील वाढती गुन्हेगारी, अवैद्य व्यवसाय, खासगी सावकारी, गावठी दारूच्या भट्ट्या, गांजाची विक्री, ...
फलटण : फलटण नगरपरिषद हद्दीत मलटण परिसरातील वाढती गुन्हेगारी, अवैद्य व्यवसाय, खासगी सावकारी, गावठी दारूच्या भट्ट्या, गांजाची विक्री, महिलांची छेडछाड, परगावचे विद्यार्थी, नागरिकांना रस्त्यात अडवून त्यांचे मोबाईल व रोकड हिसकावून घेण्याच्या प्रकारात वाढ झाली असून, त्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी मोर्चाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्याकडे करण्यात आली आहे.
नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, नगरसेवक अशोकराव जाधव, केशवराव भगत यांच्या नेतृत्वाखाली मलटण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्याकडे मोर्चाद्वारे निवेदन दिले आहे. पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी निवेदनातील तक्रारींबाबत, प्रामुख्याने ज्यांच्याविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याबाबत योग्य तपास करून, गुन्हेगारी वृत्तीचा बीमोड करण्याचे आश्वासन दिल्याचे अशोकराव जाधव यांनी सांगितले.
निवेदनात मलटण येथे सुमारे १५००० लोकवस्ती असून गेल्या पाच वर्षांपासून येथील लोकांना या गुन्हेगारीचा त्रास होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दुचाकी व चारचाकी वाहने अडवून त्यांची मोडतोड करणे आणि रात्री-अपरात्री मद्यप्राशन करून घरावर दगडफेक करणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, दागिने हिसकावणे, शालेय विद्यार्थिनींना पाहून अर्वाच्च भाषेत बोलणे, वगैरे मार्गाने दहशत निर्माण करण्याचा, दिवसाढवळ्या लूटमारीचा प्रकार सतत घडत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहराच्या एका भागातील नागरिकांनी एकत्र येऊन अशाप्रकारे सुरू असलेल्या गुन्हेगारीबाबत तक्रार करणे, त्यामधील गंभीर बाबी निदर्शनास आणून देणे गंभीर असून, शहर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा संपूर्ण शहरातून व्यक्त होत आहे.