फलटणकरांची १०५ वर्षांची प्रतीक्षा संपली
By admin | Published: June 12, 2017 01:15 AM2017-06-12T01:15:23+5:302017-06-12T01:15:23+5:30
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन; तालुक्यामध्ये आनंदोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : कऱ्हाड येथे केंद्र्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे वीडियो कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन करण्यात आल्याने फलटण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मार्गासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लोणंद-फलटण-बारामती आणि फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग व्हावा ही फलटणकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यासाठी लोकसभेत खासदार असताना माजी हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी वारंवार रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतरही वारंवार पाठपुरावा केल्याने आज लोणंद ते फलटण रेल्वे मार्ग पूर्ण झाला असून फलटण-बारामती रेल्वे मार्गाचे कामही सुरू झाले आहे.
साधारण १९१२ साली ब्रिटिशांनी लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेमार्ग करण्याचे निश्चित करून १९१८ मध्ये आराखडा तयार करण्यात आला. १९२६ साली रेल्वे मार्गासाठी ३२७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. मात्र नंतरच्या काळात हा मार्ग रखडला गेला.
हिंदूराव नाईक-निंबाळकर यांच्यासह माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आणि रेल्वे मंत्री सुरेश
प्रभूू यांनी हिरवा कंदील दिल्याने फलटण-पंढरपूर या १०५ किमी अंतराच्या रेल्वे मार्गाला मंजूरीसह १ हजार १५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. फलटण ते पंढरपुर रेल्वे मार्ग होण्याचा मार्ग मोकळा झाला असून सुरेश प्रभूंच्या हस्ते या मार्गाचे भूमिपूजन झाल्याने फलटणकरांची रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले आहे.