फलटणची कृषी बाजार समिती राज्यात अग्रेसर ठेवा
By admin | Published: September 22, 2016 11:39 PM2016-09-22T23:39:38+5:302016-09-23T00:42:36+5:30
रामराजे नाईक-निंबाळकर : वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार
फलटण : ‘राज्याच्या बदलत्या धोरणानुसार खासगीकरण वाढत जाणार आहे. रिलायन्ससारख्या कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार आहेत. फलटण बाजार समितीनेही स्पर्धेत उतरत सर्वांना बरोबर घेत खासगी क्षेत्राचा मुकाबला करत आपली बाजार समिती अग्रेसर करावी,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत
रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते.
यावेळी आमदार दीपक चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, माणिकराव सोनवलकर, मालोजीराजे बँकेचे यशवंतराव रणवरे, धनंजय पवार, उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, उपसभापती दिलीपराव अडसूळ, वसंतराव गायकवाड, दूध संघाचे उपाध्यक्ष महादेवराव चव्हाण, भीमदेव बुरुंगले, विलासराव नलवडे, नंदकुमार भोईटे, जयकुमार इंगळे, दत्तात्रय गुंजवटे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
रामराजे म्हणाले, ‘काळाच्या ओघात सर्वकाही बदलत चालले आहे. सहकाराकडून खासगीकरणाकडे असा प्रवाह सुरू झाला आहे. सहकारातून खासगीकरणाचा निर्णय आपल्या तालुक्याला चांगला माहीत आहे. राज्यातील पहिला खासगी साखर कारखाना फलटण तालुक्यातच होता.
तद्नंतरच्या काळात सहकारी साखर कारखान्यामुळे वाढलेले फलटण शहरीकरणही आपण पाहिले आहे. खासगीतून सहकाराकडे आणि सहकारातून खासगीकरणाकडे सुुरू असलेली ही स्थित्यंतरे आपल्याला नवीन नाहीत.
कोरेगाव तालुक्यात बाजार समितीचे अस्तित्व फार कमी राहिले असल्याचे आपण ऐकून आहे. दिल्लीचे व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊनच शेतमाल खरेदी करतात.
आपल्याकडे असे प्रकार जास्त नाहीत. आगामी काळातही असे प्रकार आपल्याकडे होऊ नयेत, म्हणून व्यापारी व शेतकऱ्यांच्यात समन्वय राखणे गरजेचे आहे. व्यापाऱ्यांची साखळी काढून टाकण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नियमनमुक्तीचे परिणाम आपल्याकडे दिसत नसले तरी काही काळानंतर निश्चितच दिसणार आहेत.’ (प्रतिनिधी)
स्पर्धेला तोंड देण्यासाठी कायम सज्ज राहणार!
खाजगीकरणामुळे वाढणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम सेवा या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. बाजार समितीतील कर्मचाऱ्यांबरोबरच सर्वांना अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती देवून त्याचा उपयोग सभासदांसाठी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.