ग्रेड सेपरेटरमधून येतोय मुंबई, पुण्याचा फिल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:42+5:302021-01-09T04:32:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळी ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सातारकरांना सुखद धक्का ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळी ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सातारकरांना सुखद धक्का दिला. ग्रेड सेपरेटर खुला झाल्याचे समजताच सातारकरांनी काहीही काम नसताना केवळ कुतूहल म्हणून पहिल्या दिवशी भुयारी मार्गातून रपेट मारली. यामधून प्रवास करताना मुंबई आणि पुण्यात असल्यासारखा फिल येत असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.
सातारा शहर हे जिल्ह्याचे नाक म्हणून समजले जाते. या शहरात पहिल्यांदाच पुणे, मुंबईच्या धर्तीवर ग्रेड सेपरेटरचे काम गत चार वर्षांपासून सुरू होते. गत तीन महिन्यांपासून ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास नेण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने ग्रेड सेपरेटरमधून कोणी प्रवास करू नये म्हणून भुयारी मार्गाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. भुयारी मार्ग नेमका कसा बांधण्यात आलाय, हे पाहण्यासाठी सातारकरांना उत्सुकता लागली होती. त्यातच शुक्रवारी सकाळी ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी खुला झाल्याचे समजताच विशेषत: युवक वर्ग भुयारी मार्गातून दुचाकीवरून रपेट मारू लागला. अचानक भुयारी मार्गामध्ये वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या. आनंदाच्या भरात युवक शिट्या वाजवणे, किंकाळणे, असे प्रकार करू लागले. काहीजण तर भुयारी मार्गातून इकडून-तिकडे फिरू लागले. चालत्या दुचाकीवर उत्साहाच्या भरात युवक सेल्फीही काढत होते. ग्रेड सेपरेटर न्याहाळत, आपण पुणे, मुंबईत तर नाही ना, असेही युवक एकमेकांसोबत बोलत होते. ग्रेड सेपरेटर खुला झाल्याने सातारकरांच्या आनंदाला पारावर उरला नाही. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण केवळ ग्रेड सेपरेटर पाहण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडले. यातून पोलीसही सुटले नाहीत.
ग्रेड सेपरेटरच्या निमित्ताने साताऱ्याच्या वैभवात आणखीनच भर पडलीय. परिणामी पोवई नाक्यावर आता वाहतूक कोंडीही कायमची दूर होणार आहे. त्यामुळे पोलिसांचे कामही हलके झाले आहे.
चौकट :
अन् घोषणांनी परिसर दणाणला!
खास करून ग्रेड सेपरेटर पाहण्यासाठी ग्रामीण भागातूनही युवक साताऱ्यात आले होते. या युवकांनी भुयारी मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून फोटोसेशनही केले. ग्रेड सेपरेटरमधून दुचाकीवरून तीन ते चार रपेट मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा युवकांनी दिल्या. या घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून गेला.
फोटो : जावेद खान