मातीत गाडलेल्या स्वप्नांनी घेतली फिनिक्सभरारी
By admin | Published: October 5, 2014 12:17 AM2014-10-05T00:17:56+5:302014-10-05T00:18:21+5:30
बोलेमामांचा वडापाव पुन्हा सेवेत : ‘लोकमत’च्या आवाहनाला सातारकरांनी दिला दोन लाखांचा प्रतिसाद
सातारा : सातारा शहरात राजपथावरून वाजत-गाजत मिरवणुका निघाल्या होत्या. अशा गोंधळाच्या वातावरणातच एका इमारतीची भिंत कोसळली अन् वडापावच्या गाड्यासह चंद्रकांत बोले हे मातीच्या ढिगाऱ्याखाली गुडूप झाले. ‘बोलेमामांचा वडापाव’ हे सातारकरांच्या जिभेवर कोरलेले नाव कायम राखण्याचा निर्धार त्यांच्या कन्यांनी बोलून दाखविल्यानंतर ‘लोकमत’ने सातारकरांना मदतीचे आवाहन केले अन् एक महिन्याच्या आतच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या स्वप्नांनी फिनिक्सभरारी घेतली.
सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेने बोले यांच्या पत्नी आणि चार मुली अशा परिवारावर मोठा आघात झाला. वडापावचा गाडा पुन्हा थाटण्याचा निर्धार बोलेमामांच्या कन्यांनी केला. त्याला ‘लोकमत’ने साथ देत सातारकरांना मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत दुसऱ्याच दिवसापासून विविध संस्था, मंडळे, कार्यालयांतील कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यक्तिगतरीत्याही बोले कुटुंबीयांकडे आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. बघता-बघता सुमारे दोन लाख रुपयांचा निधी उभा राहिला. बोलेमामांच्या कन्यांनी बुधवार, दि. १ आॅक्टोबरपासून पूर्वीच्या जागीच वडापावची गाडी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
बोलेमामांच्या कुटुंबीयांना असा मिळाला मदतीचा हात
सातारा ‘एलआयसी’ कर्मचाऱ्यांकडून ६५ हजारांची मदत
जी-केम कंपनी व अनंत ट्रेडिंग एजन्सीकडून आटाचक्की
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थ्यांकडून तीस हजार रुपये
श्री भवानी दुर्गोत्सव मंडळ, सातारा आणि श्री मारवाडी भवन गणेशोत्सव मंडळ, सातारा यांच्याकडून व्यवसायासाठी गाडा भेट
सप्ततारा गणेशोत्सव मंडळ, सातारा
अरविंद गवळी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, मेकॅनिकल विभाग
साताऱ्यातील अनेक संस्था आणि संघटनांनी पत्रके काढून निधी जमवून केली मदत
समर्थ भाजीविक्रेता संघटना, सातारा
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मदत
बाहेरगावाहूनही मिळाली मदत
‘सिटू’च्या कऱ्हाड मोटर्स अँड प्रोजेक्ट्स कंपनीच्या कामगारांकडून मदत
‘निवृत्तिनाथ कट्टा’ या सेवानिवृत्त व्यक्तींच्या ग्रुपकडून मदत
४सुहास राजेशिर्के यांच्याकडून आर्थिक मदत
अनेकांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर बोले कुटुंबीयांना मदत केली