तोतया पोलीस निरीक्षक निघाला दहावी नापास-लाल दिव्याच्या गाडीसोबत फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:44 PM2018-06-29T22:44:59+5:302018-06-29T22:45:44+5:30
सातारा : जेमतेम दहावी पास झालेल्या शेतकऱ्याने आपण अधिकारी असल्याचे भासविण्यासाठी चक्क लाल दिव्याच्या गाडीसोबत फोटो काढले. या फोटोच्या माध्यमातूनच त्याने युवकाला पोलीस दलात नोकरी लावतो, म्हणून अडीच लाखाला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. एका सर्वसामान्य शेतकºयाने केलेल्या अशाप्रकारच्या बनवेगिरीमुळे पोलीसही अवाक झाले आहेत.
कोल्हापूर येथे एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाºया जितेंद्र सर्जेराव पाटील (वय २५, रा. ताटोली, ता. शिराळा, जि. सांगली) याची एका नातेवाइकाने साताºयातील करंजे पेठ येथे राहणाºया संदीप सोपान गायकवाड (वय ४१) याच्याशी ओळख करून दिली.त्यावेळी गायकवाड याने आपण पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर पाकिटात असलेला फोटो त्याला दाखविण्यात आला. त्या फोटोमध्ये लाल दिव्याच्या गाडीसमोर संदीप गायकवाड अगदी ऐटीत उभा राहिला होता.
हा फोटो पाहून जितेंद्र पाटील याला गायकवाड अधिकारी असल्याची खात्री पटली. त्यानंतरच दोघांमध्ये पोलीस दलात भरती करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली. गायकवाड याने अडीच लाखांची मागणी केली. याला जितेंद्र पाटील यानेही होकार दिला; परंतु मोठी रक्कम असल्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले.पाटील याने गायकवाडच्या खात्यावर टप्प्याटप्याने अडीच लाख भरले. आता आपण पोलीस दलात भरती होणार, असं स्वप्न जितेंद्र पाहू लागला. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांतील पोलीस भरती दोन वेळा पूर्ण झाल्या तरी मला बोलविले कसे जात नाही, अशी शंका जितेंद्रला येऊ लागली.
गायकवाडकडे याची विचारणा करू लागल्यानंतर गायकवाड उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या साºया प्रकाराला दोन वर्षे उलटली. तरी नोकरीचा काही थांगपत्ता लागण्याची चिन्हे नाहीत, हे जेव्हा अखेर जितेंद्रच्या लक्षात आले. तेव्हा त्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संदीप गायकवाडच्या विरोधात फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली. जितेंद्र आणि संदीप गायकवाडची ज्या मुलाने ओळख करून दिली. त्या मुलाचीही आता पोलीस चौेकशी करणार आहेत. कोणत्या आधारे गायकवाड मुलांना पोलीस दलात भरती करतो, हे त्या संबंधित मुलाला माहित असावे, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कोणाच्या तक्रारी असतील तर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन शाहूपुरी पोलिसांनी केले आहे.
पोलीस घेणार त्या गाडीचा शोध..
हवालदार अतीश कुमठेकर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन संदीप गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या. कुमठेकर यांनी त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर अनेक किस्से समोर आले. गायकवाड हा मूळचा वाई तालुक्यातील कळंबे गावचा. या ठिकाणी तो शेती करतो. मात्र, साताºयात तो नातेवाइकांकडे राहत आहे. येऊन-जाऊन तो गावी शेती व्यवसाय करतो. केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या गायकवाडने पोलीस अधिकारी असल्याचे दाखविण्यासाठी लाल दिव्याची गाडी निवडली. गाडीसमोर उभे राहून साध्या वेशात फोटोही काढले. मात्र, जी गाडी गायकवाडने फोटो काढण्यासाठी निवडली आहे. त्या गाडीचा नंबर फोटोमध्ये पोलिसांना स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पोलीस संभ्रमात पडले आहेत. त्याने काढलेल्या फोटोतील गाडीचा शोध घेतला जाणार आहे.