लाचप्रकरणी फलटणच्या डीवायएसपींवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 06:09 AM2019-04-18T06:09:43+5:302019-04-18T06:09:45+5:30
फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
सातारा : फसवणूक गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी पावणेदोन लाखाची लाच मागितल्याच्या आरोपावरून फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत अधिक माहिती
अशी की, फलटण शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यामध्ये तडजोड करून देण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी अडीच लाखांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर १ लाख ७५ हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार पुणे येथील लाचलुचपत आणि साताऱ्याच्या विभागाने फलटण येथे बुधवारी दुपारी सापळा लावला. परंतु त्यांनी
ही रक्कम स्वीकारली नाही.
मात्र, लाचेची मागणी केल्याचे
निष्पन्न झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्यावर भ्रष्टाचार
प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांनी
सुरू केली.