पिकपाॅकीटमार टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूरच्या दोन महिलांना अटक; ५० तोळ्यांचे दागिने हस्तगत
By दत्ता यादव | Published: January 31, 2024 09:58 PM2024-01-31T21:58:08+5:302024-01-31T21:58:41+5:30
तब्बल ३२ लाखांचे ५० तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या बसस्थानकात पिकपाॅकीट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, यामध्ये एका सराफासह दोन महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ३२ लाखांचे ५० तोळ्यांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या टोळीमध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
रूपाली अर्जुन सकट (वय ३०), गीता संदीप भोसले (दोघीही रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर), सराफ रफिक अजिज शेख (४०, रा. सांगली), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सातारा बसस्थानकातून सातत्याने महिलांच्या गळ्यातील तसेच पर्समधील दागिने चोरीस जात होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून बसस्थानकात साध्या वेशात पाळतीवर ठेवण्यात आले. विशेषतः संशयास्पद महिलांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत होते. त्यातील दोन महिलांचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले. रूपाली सकट व गीता भोसले या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर सातारा बसस्थानकासह जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत त्यांनी पिकपाॅकीटमारी केल्याची कबुली दिली.
बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने व साहित्य चोरी करून ते सांगलीतील सराफाकडे विकले जात होते, अशी माहिती या दोन्ही महिलांनी दिल्यानंतर पोलिसांनी सांगलीतून रफिक शेख या सराफाला अटक केली. या महिलांनी विकलेले ३२ लाखांचे सोने त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले. या महिलांच्या साेबतीला आणखी तीन संशयित असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र बोरे, साबीर मुल्ला, हसन तडवी, महिला पोलिस दीपाली यादव, सौजन्या मोरे, शकुंतला सणस, आरती भागडे, दीपाली गुरव, पंकजा जाधव आदींनी ही कारवाई केली.
केवळ सातारा जिल्ह्यातच चोरी..
या महिलांनी सातारा शहर, वडूज, फलटण शहर, कऱ्हाड शहर, दहिवडी, कोरेगाव, या बसस्थानकांत प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली असल्याची कबुली दिली. यापूर्वी या टोळीवर कुठेही गुन्हे दाखल नाहीत. पहिल्यांदाच ही टोळी उघडकीस आली आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच ही टोळी चोरी करत होती.
चोरीसाठी कारचा वापर
या महिला चोरी करण्यासाठी कारने साताऱ्यात यायच्या. एक मंगळसूत्र चोरी केल्यानंतर तातडीने त्या पुन्हा कारमधून कोल्हापूरला निघून जायच्या. पोलिसांनी त्यांच्यावर वाॅच ठेवून ही चोरी काैशल्याने उघडकीस आणली.