खाकी वर्दीतील संजय देशमानेंची चित्रं अधीक्षकांच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:46 PM2018-08-02T22:46:42+5:302018-08-02T22:46:58+5:30
सातारा : पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ताणामुळे आपल्या आवडी-निवडी अन् छंद जपता येत नाहीत. मात्र, सातारा पोलीस दलातील हवालदार संजय देशमाने अपवाद आहेत. त्यांनी आपली चित्रकलेची आवड नुसती जोपासली नाही तर त्यांनी आपण काढलेल्या चित्रकलेत जीव ओतला. त्यामुळे त्यांनी काढलेली अनेक चित्रेही पोलीस अधीक्षकांच्या दालनाची शोभा वाढवत आहेत. या आता दालनात नूतन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख बसणार आहेत.
सातारा पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात संजय देशमाने चालक म्हणून काम करतात. त्यांची जनरल ड्यूटी असते. त्यामध्ये स्कॉट, पीसीआर आणि बंदोबस्तातील वाहने चालवण्याची जबाबदारी असते. त्यांचे काम म्हणजे अचानक आणि बेभरवसी असेच असते. व्हीआयपी, मंत्री आणि प्रशासकीय अधिकाºयांचे दौरे यासाठी गाडी घेऊन धावावे लागत असते. त्यातही कॅनव्हासमधील छोटी-मोठी ५० ते ६० तैलचित्रे काढली आहेत.
त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड आहे. त्यांनी आपले शिक्षण करत असताना चित्रकलेची आवड जोपसली. पोलीस खात्यामध्ये ज्या-ज्या ठिकाणी बदली होईल त्या ठिकाणी आपले काम प्रामाणिकपणे करत असताना मिळेल त्या वेळेला त्यांनी व्यक्ती, ऐतिहासिक, पौराणिक आणि निसर्ग चित्र काढण्यात आपला वेळ खर्ची केला.
देशमाने यांनी आतापर्यंत पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग, अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण, विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश मेकला, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, जय जाधव, अमोल तांबे, आदी पोलीस अधिकाºयांची कॅनव्हासवरील तैलचित्रे काढून त्यांना भेट दिली आहेत.
शिवराज्यभिषेक तैलचित्र ठरला अधिक आकर्षक..
तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी पोलीस मुख्यालय आणि त्याच्यासमोर संचलन करणारे तैलचित्र काढले होते. त्यानंतर संदीप पाटील यांनी शिवराज्यभिषेक सोहळ्याचे चित्र काढण्यास सांगितले. देशमाने यांनी काढलेले तैलचित्र पाटील यांना आवडल्याने त्यांनी आपल्या दालनात लावले आहे.
मुख्यालयाचे तैलचित्र पोलिसांच्या शिल्डवर
संजय देशमाने यांनी पोलीस मुख्यालय आणि त्यासमोर पोलिसांचे संचलन हे चित्र तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी इतके आवडले की त्यांनी सातारा पोलीस दलाच्या सर्व शिल्डवर तेच चित्र वापरले जाते.