काळूबाईच्या यात्रेसाठी मांढरगडावर भाविक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:53 PM2019-01-20T22:53:28+5:302019-01-20T22:53:33+5:30
वाई : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाईच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. जागर कार्यक्रमासाठी भाविक दाखल होऊ ...
वाई : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाईच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. जागर कार्यक्रमासाठी भाविक दाखल होऊ लागले आहेत. यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी असून, भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
उत्सवाच्या मुख्य दिवसाच्या पूर्वसंध्येला रविवार, दि. २० रोजी देवीची पालखीतून मिरवणूक काढून मंदिर परिसरात देवीचा जागर करण्यात येणार आहे. सोमवार, दि. २१ रोजी शाकंभरी-पौष पौर्णिमा असून पहाटे सहा वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्रमुख प्रशासक आर. डी. सावंत व पत्नी शमा यांच्या हस्ते व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश वर्षाताई पारगावकर तसेच विश्वस्त तथा प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, प्रशासकीय विश्वस्त तथा तहसीलदार रमेश शेंडगे, विश्वस्त अॅड. मिलिंद ओक, अॅड. महेश कुलकर्णी, अतुल दोशी, जीवन मांढरे, चंद्रकांत मांढरे, राजगुरू कोचळे, सुधाकर क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर व इतर शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत काळेश्वरी देवीची महापूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर देवीचे दर्शन भाविकांना घेता येईल. उत्तर यात्रा मंगळवार, दि. २२ रोजी होणार असून, त्या दिवशी मुख्य यात्रेची समाप्ती होणार आहे.
मांढरगडावर येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची सोय केली आहे. परंतु त्याचा अपव्यय टाळावा. यात्राकाळात परिसर स्वच्छ ठेवावा, ठरवून दिलेल्या वाहनतळावरच वाहने पार्किंग करून वाहतुकीची कोंडी टाळावी, रांगेत जाऊन दर्शन घ्यावे, असे प्रशासन व देवस्थान ट्रस्टमार्फत केले आहे.
पशुहत्यास बंदी
विश्वस्त मंडळाने भाविकांचे सुरक्षिततेसाठी काही निर्णय घेतले आहेत. यात्रेदरम्यान परिसरात पशुहत्येस मनाई केली आहे. झाडांवर खिळे ठोकणे, लिंबे टाकणे, काळ्या बाहुल्या बांधणे आदी प्रकार बंद करण्यात आले आहे.
देवीचे दर्शन सुलभतेने घेण्यासाठी तसेच दर्शन घेतल्यानंतर खाली उतरण्यासाठी स्वतंत्र मार्ग केला आहे. मांढरदेव देवस्थान व विश्वस्त मंडळामार्फत विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत.