पिंड साकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 AM2021-05-07T04:41:21+5:302021-05-07T04:41:21+5:30
कऱ्हाड : महारुगडेवाडी (ता. कऱ्हाड) येथील मल्लांनी तालमीत भगवान शंकराची आकर्षक पिंड तयार केली आहे. हनुमान जयंतीनिमित्त ही ...
कऱ्हाड : महारुगडेवाडी (ता. कऱ्हाड) येथील मल्लांनी तालमीत भगवान शंकराची आकर्षक पिंड तयार केली आहे. हनुमान जयंतीनिमित्त ही पिंड तयार करण्यात आली. मल्लविद्या शिकणाऱ्यांवर योग्य संस्कार व्हावेत, यासाठी गावातील ज्येष्ठ मल्ल पुढाकार घेत आहेत. शिकणाऱ्या मल्लांनी हनुमान जयंतीनिमित्त गावातील तालमीत मातीत पिंड तयार केली. चाफ्याच्या पांढऱ्या फुलांनी ती सजविण्यात आली होती.
जुजारवाडी कोरोनामुक्त
कऱ्हाड : जुजारवाडी (ता. कऱ्हाड) गावाने एकत्रित प्रयत्न केल्यामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे. सरपंच अलका जुजार, उपसरपंच मोहन जुजार, सदस्य सुषमा जुजार, रेखा जुजार, कल्पना जुजार, ग्रामसेवक शशिकांत होनमुखे यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून, ग्रामपंचायत सातत्याने जागरूक राहिली. काळजी घेण्यासाठी घरोघरी जनजागृती करण्यात आली.
रक्तदानास प्रतिसाद
तळमावले : करपेवाडी (ता. पाटण) येथील युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रक्तदान शिबीर पार पडले. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी हे शिबीर घेण्यात आले. सरपंच रमेश नावडकर यांनी शिबिराच्या आयोजनामागची भूमिका सांगितली. राजेश करपे, महेश करपे, अर्जुन करपे, रुपेश साळुंखे, सचिन साळुंखे, सागर साळुंखे, अमरदीप करपे उपस्थित होते.