लाल दिव्याभोवती पिंगा? आता वाजवा शिट्टी!
By Admin | Published: September 23, 2015 11:30 PM2015-09-23T23:30:35+5:302015-09-24T00:03:25+5:30
रामराजे नाईक-निंबाळकर : ‘श्रीराम’च्या वार्षिक सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर टीकास्त्र
फलटण : साखरधंद्यातले आपल्याला जास्त कळतेय, हे दाखवण्याच्या नादात अव्वाच्या सव्वा दर मागणारे आज सत्तेत आल्यावर गप्प बसून लाल दिव्याभोवती पिंगा घालत आहेत. दरासाठी आता तुमची शिट्टी का वाजत नाही? ऊस परिषद का होत नाही? आंदोलन होत नाही, असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्य विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नाव न घेता केला.येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे आदी उपस्थित होते.रामराजे म्हणाले, ‘श्रीराम साखर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचा आम्ही शब्द दिला होता, तो पूर्ण करीत आणला आहे. मोठ्या अडचणीतून कारखाना बाहेर काढताना एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. कारखान्याची देणी कमी करीत आणली असून सगळेच गोडधोड होत असताना कारखान्याला कधीही ऊस न घालणारे विरोधक सभेत नाहक प्रश्न उपस्थित करुन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सातत्याने कारखान्याच्या विरोधकात कोर्टकचेऱ्या करणाऱ्यांना खरेतर बोलण्याचा अधिकार नाही. विकृत बुध्दीने बुद्धिभेद करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी कारखान्यात राजकारण आम्ही शिरू देणार नाही.’ शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना साखरधंदा व कारखाने तेजीत होते. ऊस उत्पादकांना चांगला दर मिळत होता. आता सत्ताबदल झाल्याने व नवीन सरकारचा साखरधंदा व सहकार क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने साखरधंदा अडचणीत येऊ लागला आहे. यापूर्वी आमचे सरकार केंद्रात व राज्यात सत्तेत असताना ऊसदरासाठी जयसिंगपूरला ऊस परिषदा घेऊन दर ठरविणारे व आंदोलने करणारे आता कोठे आहेत, असा सवाल करुन आपल्याला शेती व साखर धंद्यातले जास्त कळतेय, असे समजणारे आता का आंदोलन करीत नाहीत, असा सवाल रामराजेंनी केला.संजीवराजे नाईक-निंबाळकर दादाराजे खर्डेकर, डॉ. बाळासाहेब शेंडे यांची भाषणे झाली. सभेपूर्वी कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ रामराजेंच्या हस्ते पार
पडला. (प्रतिनिधी)
श्रीराम’कडून ८४ कोटी शेतकऱ्यांना अदा
श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाकडे गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ३ लाख ३३ हजार ५०१ मेट्रिक टन उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २२०७.८२ रुपये दराने ८४ कोटी ६७ लाख ३ हजार १२० रुपयांचे पेमेंट आजअखेर संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. साखरेच्या दरातील घसरणीमुळे श्रीराम जवाहरकडे गाळपास आलेल्या उसाचे पेमेंट करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. तथापि, रामराजे नाईक-निंबाळकर, कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाशराव आवाडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे श्रीराम साखर उद्योगास जिल्हा बँकेतून उसाचे पेमेंट अदा करण्यासाठी ११ कोटी १ लाख ९८ हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याने उसाला एफआरपीप्रमाणे प्रतिटन २२०७ रुपये ८२ पैसे प्रमाणे पेमेंट करण्याचे शक्य झाल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
बलकवडीचे पाणी लवकरच आंदरुडला
नीरा-देवघरच्या कालव्याचा प्रश्न एका गावामुळे अडला आहे. तो सुटल्यास कालव्यांची कामे मार्गी लागणार आहे. धोम-बलकवडीचे पाणी एक ते दीड वर्षात आंदरुडपर्यंत पोहोचणार आहे. मी पाहिलेले स्वप्न ९० टक्के पूर्ण झाले आहे. राहिलेले १० टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधकांकडे मोठे मन नाही. त्यांचा आत्मा अतृप्त आहे. त्यामुळे त्यांच्या नादी लागू नये. श्रीराम कारखाना सुरळीत चालू राहण्यासाठी संपूर्ण ऊस कारखान्याला देण्याचे आवाहन रामराजेंनी केले.
विरोधकांचा सभात्याग
अॅड. नरसिंह निकम यांनी या सभेत दोन प्रश्न उपस्थित केले. त्यांची अपेक्षित उत्तरे त्यांना न मिळाल्याने त्यांनी सर्व विरोधकांना घेऊन सभात्याग केला. त्यावेळी काही सत्ताधारी व विरोधकांत प्रश्नांवरून ‘तू तू - मैं मैं’ झाली.