असाही प्रामाणिकपणा, पिंगळीच्या धनाजी जगदाळे यांनी सापडलेले ४० हजार रुपये केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 05:48 PM2019-10-31T17:48:26+5:302019-10-31T17:56:17+5:30
पैशासाठी अनेक माणसं वाटेल ते करतात. अगदी नातीगोतीही तोडतात. अशामध्ये आपण प्रमाणिकपणा विरून गेलोय. मात्र प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचं दिसून आलं ते एका धनाजी जगदाळे नावाच्या व्यक्तीमुळे. होय माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील धनाजी जगदाळे यांनी सापडलेले ४० हजार रुपये परत केले व बक्षीसही स्वीकारले नाही. फक्त तिकिटासाठी ७ रुपये घेतले. यामुळे आजच्या काळात धनाजी हे मानाने धनवान ठरू शकतात.
दहिवडी : पैशासाठी अनेक माणसं वाटेल ते करतात. अगदी नातीगोतीही तोडतात. अशामध्ये आपण प्रामाणिकपणा विरून गेलोय. मात्र प्रामाणिकपणा आजही जिवंत असल्याचं दिसून आलं ते एका धनाजी जगदाळे नावाच्या व्यक्तीमुळे. होय माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथील धनाजी जगदाळे यांनी सापडलेले ४० हजार रुपये परत केले व बक्षीसही स्वीकारले नाही. फक्त तिकिटासाठी ७ रुपये घेतले. यामुळे आजच्या काळात धनाजी हे मानाने धनवान ठरू शकतात.
याबाबत माहिती अशी की, पिंगळी बुद्रुक येथील धनाजी जगदाळे (वय ५४) हे घरी जायला प्रवासासाठी पैसे नसल्याने कोणतरी ओळखीचे मिळेल, या आशेने दहिवडीच्या बसस्थानकात वाट पाहत बसले होते. बराचवेळ वाट पाहूनही कोणी येईना. रात्रीपर्यंत थांबले. त्यावेळी तेथे त्यांना एका व्यक्तीचे ४० हजार रुपये सापडले. मात्र, ते पैसे घेऊन निघून जावे, असा किंचितही विचार त्यांच्या मनात आला नाही.
त्याचवेळी धनाजी हे पैसे कोणाचे आहेत का? असे विचारू लागले. त्यानंतर धनाजींनी ज्याचे पैसे आहेत त्याला दिले. त्यावेळी धनाजी यांना बक्षीसरुपी एक हजार रुपये देऊ करण्यात आले; पण धनाजी म्हणाले, मला पिंगळीला जायचंय. माझ्याकडे पैसे नाहीत. मला फक्त प्रवासासाठी ७ रुपये द्या. त्यानंतर ४० हजारांतील ७ रुपयेच घेऊन धनाजी निघून गेले.
मनाने धनवान असलेल्या या धनाजींचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर धनाजींनी ते पैसे काढून देताच हाच आपला पैशांचा बंडल आहे, असे सांगत संबंधिताचे डोळे पाणावले. बायकोचे आॅपरेशन कसे करायचे? हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटणार होता. कारण, त्यासाठीच संबंधित व्यक्तीने पैसे आणले होते.
७ रुपयांसाठी अनेक गाड्या सोडल्या...
धनाजी यशवंत जगदाळे यांचे हातावर पोट. दररोज काम केले तरच कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. त्यादिवशीही दहिवडीचा आठवडा बाजार झाल्यावर ते दहिवडी बसस्थानकात आले होते. त्यावेळी समोर गावाकडे जाण्यासाठी एसटी लागली होती; परंतु तिकिटासाठी ७ रुपये नव्हते. गावातीलही कोणी ओळखीचा दिसत नव्हता. अनेक एसट्या सोडल्या पण ओळखीची व्यक्ती कोणीच दिसेना. जायचं कसं? हा विचार करत कंटाळलेले धनाजी बसल्या जागेवर झोपून गेले.
रात्री दहा वाजता जाग आली तेव्हा अंधार खूप पडल्याचे लक्षात आले. त्याचदरम्यान धनाजी जगदाळेंना जवळ ४० हजार रुपयांचा बंडल पडलेला दिसला. हे पैसे घेऊन दिवाळीचा सण चांगला साजरा करू, असा विचारही त्यांच्या मनात आला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जगदाळे हे धनवानच ठरलेत.
अनेक माणसे पैशाने श्रीमंत असतात; पण मनाची श्रीमंती असणारे धनाजी जगदाळे हे विरळच. ते शेजारी बसून ही वस्तुस्थिती सांगत होते. त्यावेळी माझ्याही डोळ्यात अश्रू आले. विश्वाची निर्मिती करताना परमेश्वर असे ही देवदूत पृथ्वीवर पाठवतो, याची प्रचिती आली. खरच धनाजी हे मनाने धनवान निघाले.
- राजेंद्र जगदाळे,
पिंगळी बुद्रुक