Satara: पिंक, दिव्यांग, युवा, आदर्श मतदान केंद्र उभारणार; मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:12 PM2024-10-22T16:12:59+5:302024-10-22T16:14:40+5:30

पिंक बुथ केंद्रावर सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी, पोलिस कर्मचारी या महिलाच असणार

Pink Divyang Yuva Adarsh ​​polling stations will be set up in Karad North Assembly Constituency | Satara: पिंक, दिव्यांग, युवा, आदर्श मतदान केंद्र उभारणार; मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

Satara: पिंक, दिव्यांग, युवा, आदर्श मतदान केंद्र उभारणार; मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाचा उपक्रम

कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासनातर्फे विविध मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असून पिंक, दिव्यांग, युवा व आदर्श मतदान केंद्रांचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मतदान केंद्र क्रमांक २३९ उंब्रज हे केंद्र पिंक बुथ सखी असणार आहे. केंद्रावर सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी, पोलिस कर्मचारी या महिलाच असणार आहेत. या केंद्राला गुलाबी किंवा गुलाबी छटा असणारे विविध रंग दिले जातील. मतदान केंद्र क्रमांक १३४ अपशिंगे हे केंद्र दिव्यांग मतदान केंद्र असणार आहे. या केंद्रावरील सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी हे दिव्यांग असणार आहेत. मतदान केंद्र क्रमांक १५६ साप हे केंद्र युवा मतदान केंद्र असणार आहे. या केंद्रावरील सर्व मतदान अधिकारी, स्थानिक मतदान कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी हे युवा असणार आहेत.

मतदान केंद्र क्रमांक १४ नागठाणे, १४८ रहिमतपूर, २३३ उंब्रज, ३०३ पुसेसावळी ही केंद्रे आदर्श मतदान केंद्र म्हणून स्थापन केली जाणार आहेत. सुशोभित आकर्षक अशा या केंद्रात पेयजल, व्हीलचेअर, रँप वॉक, आरोग्य सेवक आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. मतदान केंद्र क्रमांक २८५ वाघेरी हे मतदान केंद्र पर्दानशी केंद्र असणार आहे. या केंद्रावर महिला मतदान कर्मचाऱ्यांच्या साह्याने पर्दानशी मुस्लिम महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी खास सुविधा असणार आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कऱ्हाड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी डॉ. जस्मिन शेख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे यांनी ही केंद्रे स्थापन करण्याचे नियोजन केले आहे.

Web Title: Pink Divyang Yuva Adarsh ​​polling stations will be set up in Karad North Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.