पाइपची बंदूक; ‘मेड इन काढणे’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:50+5:302021-05-30T04:29:50+5:30
तुपेवाडी-काढणे येथील मारुती तुपे हे शेती करतात. गतवर्षी त्यांनी भुईमूग केला होता. मात्र, रानडुकरांसह इतर प्राण्यांकडून भुईमुगाची नासधूस केली ...
तुपेवाडी-काढणे येथील मारुती तुपे हे शेती करतात. गतवर्षी त्यांनी भुईमूग केला होता. मात्र, रानडुकरांसह इतर प्राण्यांकडून भुईमुगाची नासधूस केली जात होती. त्यामुळे ते चिंतित होते. पिकाच्या राखणीसाठी छऱ्याची बंदूक घेण्याचा त्यांनी विचार केला. मात्र, त्या बंदुकीची किंमत पाच हजारांवर असल्याचे त्यांना समजले. एवढी रक्कम गुंतविणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी यावर काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न केला.
पीव्हीसी पाइपपासून बंदूक बनविण्याचा त्यांनी ध्यास घेतला. त्यासाठी त्यांनी एक फुटाची अडीच इंची पीव्हीसी पाइप, दीड फुटाची अडीच फुट लांबीची पीव्हीसी पाइप, दीड आणि अडीच या पाइपांना जोडणारा जॉइंट, पाठीमागे बसविण्यासाठी झाकण, थोडेसे कार्बाईड, एक लायटर घेतले. या साहित्याकरिता त्यांनी केवळ पाचशे रुपये खर्च केले आणि या साहित्यापासून त्यांनी एक बंदूक तयार केली.
- संजय पाटील
- कोट (फोटो : २९मारुती तुपे)
प्राणी, पक्ष्याला इजा न करता उपाययोजना करण्याचा माझा विचार होता. त्यासाठी मी पाइपासून बंदूक बनविली आहे. या बंदुकीने मोठा आवाज होतो. आवाजामुळे प्राणी, पक्षी शेतात थांबत नाहीत. पुन्हा ते शेताकडे फिरकतही नाहीत. आजपर्यंत मी विभागात दहा ते बारा शेतकऱ्यांना अशी बंदूक तयार करून दिली आहे.
- मारुती तुपे, तुपेवाडी
- चौकट
... अशी आहे बंदूक !
या बंदुकीत कार्बाईडचा एक छोटा खडा टाकून थोडेसे पाणी टाकल्यानंतर दहा सेकंदात लायटर ओढल्यानंतर कानठळ्या बसवणारा आवाज येतो. पाखरे, जनावरे या आवाजाने बिथरून पुन्हा तिकडे यायचे नाव काढत नाहीत. या बंदुकीमुळे जनावरांचा त्रास पूर्णपणे बंद झाला.
फोटो : २९केआरडी०५
कॅप्शन : तुपेवाडी-काढणे, ता. पाटण येथील शेतकरी मारुती तुपे यांनी बनविलेल्या बंदुकीचा अनेक शेतकरी सध्या वापर करीत आहेत.