Satara crime: बोगस पोलिसाकडे आढळले पिस्टलचे राऊंड, वाहने अडवून करत होता कागदपत्रांची तपासणी
By नितीन काळेल | Published: June 22, 2023 01:01 PM2023-06-22T13:01:36+5:302023-06-22T13:01:36+5:30
सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर पोलिसांचा वेश घालून वाहनांची कागदपत्रे तपासणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी बुरखा फाडला. संबंधित तरुण सातारारोडचा ...
सातारा : सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर पोलिसांचा वेश घालून वाहनांची कागदपत्रे तपासणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी बुरखा फाडला. संबंधित तरुण सातारारोडचा असून त्याच्याकडे पिस्टलचे राऊंडस् मिळून आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सातारा वाहतूक नियंत्रण शाखेतील हवालदार श्रीकांत निकम (रा. बोरखळ, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर सुनील संजय राऊत (वय २४, रा. सातारारोड, ता. कोरेगाव) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, दि. २१ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुनील राऊत हा सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर पोलिसाच्या वेशात आढळून आला. त्यावेळी तो पोलिस असल्याची बतावणी करुन लोकांची वाहने अडवत होता. तसेच संबंधित गाड्यांच्या कागदपत्रांची मागणी करत असल्याचे दिसून आले.
संशय आल्याने त्याची माहिती घेतली असताना तो पोलिस असल्याचे भासवत असल्याचे स्पष्ट झाले. तसेच अंगाची झडती घेतल्यावर त्याच्या कमरेला बांधलेल्या बेंडरोलमध्ये पिस्टलचे राऊंड आढळून आले.
याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुनील राऊत याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.