Satara: शिरवळ येथे दोन युवकांकडून पिस्तूल जप्त; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:12 PM2024-04-22T13:12:44+5:302024-04-22T13:13:11+5:30

पिस्तूल नेमके कशासाठी?

Pistol seized from two youths at Shirwal Satara; Filed a case | Satara: शिरवळ येथे दोन युवकांकडून पिस्तूल जप्त; गुन्हा दाखल

Satara: शिरवळ येथे दोन युवकांकडून पिस्तूल जप्त; गुन्हा दाखल

शिरवळ : शिरवळ येथील पळशी रोड याठिकाणी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका सराईत टोळीच्या दोन युवकांकडून विनापरवाना बाळगलेल्या एक देशी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतुसे व दुचाकी, असा एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

घटनास्थळ व शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गस्त वाढविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शिरवळचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक धर्मसिंह पावरा, पोलिस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर आदीजण गस्त घालत होते.

पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांना पळशी रोडला असणाऱ्या एका अपार्टमेंटच्या वाहनतळ आवारात दोन युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली. संबंधित ठिकाणी पथकाने छापा टाकला असता त्याठिकाणी दुचाकी (एमएच ०२ डीडी ५९३०) या दुचाकीवर संशयास्पदरीत्या बसलेल्या दीपक संतोष पाटणे (वय २२, रा. विंग, ता. खंडाळा), ओम सतीश कदम (१८, रा. लोणी, ता. खंडाळा) आढळले. यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळील कापडी पिशवीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आढळली. यावेळी पिस्तूल, काडसुतांसह दुचाकी, असा एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विनापरवाना पिस्तूल व काडतुसे बाळगल्याप्रकरणी पोलिस अंमलदार मंगेश मोझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. यावेळी शिरवळ पोलिसांनी दीपक पाटणे, ओम कदम याला अटक करीत खंडाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक धर्मसिंह पावरा तपास करीत आहेत.

पिस्तूल नेमके कशासाठी?

शिरवळ येथे सराईत टोळीतील दोन युवकांना शिरवळ पोलिसांनी शिताफीने बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. यामध्ये खंडाळा तालुक्यातील स्थानिक युवकांचा सहभाग निष्पन्न झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दीपक पाटणे व ओम कदम यांनी पिस्तूल कोणाला विक्री करण्याकरिता आणली होती की शिरवळ परिसरात दहशत निर्माण करण्याकरिता आणली होती. त्याचप्रमाणे संबंधित युवक हे सराईत गुन्हेगार टोळीशी संबंधित असल्याने याबाबतच्या कारणाचा तपास सुरू आहे.

शिरवळ पोलिस ठाणे हद्दीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्याकरिता शिरवळ पोलिस कटिबद्ध आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसवून ती मोडीत काढण्याला प्राधान्य दिले आहे. कडक धोरण अवलंबण्यात येणार आहे. -संदीप जगताप, पोलिस निरीक्षक, शिरवळ

Web Title: Pistol seized from two youths at Shirwal Satara; Filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.