कुडाळ-मेढा रोडवरील खड्डा देतोय अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:39 AM2021-03-31T04:39:23+5:302021-03-31T04:39:23+5:30
कुडाळ : जावली तालुक्याच्या मेढा या मुख्य ठिकाणाला जोडणारा कुडाळ-मेढा हा महत्त्वाचा रहदारीचा रस्ता आहे. या ...
कुडाळ : जावली तालुक्याच्या मेढा या मुख्य ठिकाणाला जोडणारा कुडाळ-मेढा हा महत्त्वाचा रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यात कुडाळनजीक डबडेवाडीजवळ मोठा खड्डा पडला आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, अनेक लहान-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे.
गेली काही दिवसांपूर्वी याच मार्गावर दरे बुद्रुक याठिकाणी खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले होते. या रस्त्यावर कायम वाहतूक असते. डबडेवाडी याठिकाणी रस्त्याच्या मधोमध एका बाजूला मोठा खड्डा पडला असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी हा खड्डा न दिसल्याने दुचाकीस्वारांना चांगलाच प्रसादही मिळाल्याच्या घटना याठिकणी घडल्या आहेत. समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना गाडीचे चाक खड्ड्यात जाऊन गाडी एका बाजूला कलली जात आहे. यामुळे बांधकाम विभाग एकदा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. बांधकाम विभागाने गंधारीची भूमिका न घेता तत्काळ या खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी वाहनचालक व नागरिकांकडून मागणी होत आहे.
फोटो : ३०कुडाळ-रोड
कुडाळ-मेढा रस्त्यावरील डबडेवाडीजवळील हा खड्डा अपघातांना निमंत्रण देत आहे. (छाया : विशाल जमदाडे)