क्षेत्र माहुलीजवळ खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:18+5:302021-01-02T04:55:18+5:30
जुना मोटर स्टँड घाणीच्या विळख्यात सातारा : जुना मोटर स्टॅंड परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईमुळे ठिकठिकाणी घाणीचे ...
जुना मोटर स्टँड घाणीच्या विळख्यात
सातारा : जुना मोटर स्टॅंड परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईमुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील काही विक्रेत्यांना रस्त्यावर बसूनच भाजी विक्री करावी लागत आहे. या ठिकाणी कचरा कुंडीची व्यवस्था नसल्याने विक्रेते सायंकाळी विक्रीयोग्य नसलेला भाजीपाला रस्त्यावरच टाकत आहेत.
थंडीच्या कडाक्याने पर्यटक गारठले
सातारा : सध्या वातावरणात गारठा वाढल्याने थंडीत वाढ होत आहे. त्यामुळे अनेकांनी स्वेटर आणि कानटोप्या कपाटातून काढल्या आहेत. थंडी वाजत असल्याने दुपारपर्यंत कडक उन्हात बसत आहेत. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्णालयांत गर्दी वाढत आहे.
शहरातील ओढे, नाल्यांमध्ये स्वच्छता
सातारा : सातारा शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस झाला. त्यामुळे यवतेश्वर, अजिंक्यतारा, पेढ्याचा भैरोबा डोंगरावरून पावसाचे पाणी खळाळून वाहिले. त्यामुळे शहरातील ओढे, नाले स्वच्छ झाले आहेत. ओढ्यात साठणारा कचरा नाहीसा झाल्याने दुर्गंधीही कमी झाली आहे.
क्षमतेपेक्षा अधिक उसाची वाहतूक
फलटण : सध्या फलटण तालुक्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. तोडणी केलेला ऊस ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या माध्यमातून कारखान्यांकडे नेला जात आहे. या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा अधिक उसाची वाहतूक होत असल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
वाहनधारक करतायेत तारेवरची कसरत
सातारा : सातारा-महाबळेश्वर या मार्गावर सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीला मोठी अडचण निर्माण होत आहे. ठिकठिकाणी रस्ता खोदण्यात आल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने केळघर घाटातून वाहन चालविणे जिकिरीचे बनत आहे.
रस्त्याची दुरवस्था; वाहनधारक हैराण
सातारा : आकाशवाणी झोपडपट्टी व मोळाचा ओढा परिसरातील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
तिसरा डोळा करतोय प्रवाशांची सुरक्षा
सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे होणाऱ्या गुन्ह्यांत घट झाली आहे. गेल्या दोन वर्षात अनेक गुन्हे उघडकीस आले असल्याचे येथे कार्यरत असणाऱ्या पोलिसांनी सांगितले. १ जानेवारी २०१८ मध्ये बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांच्या आधारे आतापर्यंत सात ते आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.