लॉकडाऊनच्या फेऱ्यात पिचतोय शेतकरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:40+5:302021-04-16T04:39:40+5:30

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शेती कधी तारते, तर अनेक वेळा तोट्याचाच सामना करावा लागतो. असाच प्रकार ...

Pittoy farmers in lockdown round ... | लॉकडाऊनच्या फेऱ्यात पिचतोय शेतकरी...

लॉकडाऊनच्या फेऱ्यात पिचतोय शेतकरी...

Next

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शेती कधी तारते, तर अनेक वेळा तोट्याचाच सामना करावा लागतो. असाच प्रकार आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही शेतकऱ्यांना अनुभवयास येत आहे; कारण, लॉकडाऊनमुळे व्यापारी माल घ्यायला तयार नाही. त्यातच दरही पाडू लागले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये माल न्यायचा कोठे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. त्यातच बुधवारचा पाऊस आणि गारपिटीत कांद्याला दणका बसला; तर टोमॅटोचा चिखल झालाय. शेतकऱ्यांना बसलेला हा फटका आणखी वर्षभर मागे नेणारा आहे.

कृषिप्रधान देशात आजही ६० टक्क्यांहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेती हीच आजही अनेकांना तारणहार वाटते. अनेक तरुण मोठमोठ्या नोकऱ्या सोडून शेतीच्या प्रवाहात येत आहेत. पण, नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास यांचा विचार करून शेती केली तर ती फायद्याचीच होते; पण, अलीकडील काही वर्षांत या शेतीला मोठा फटका बसला आहे तो निसर्गाचा. कधी अवकाळी पाऊस, गारपीट तर कधी अती पर्जन्यवष्टी हे सतत होत आहे. कधी रास्त भाव मिळत नाही. यामुळे एखाद्या पिकाने हात दिला तर दुसरे काढून घेते, अशी स्थिती आहे. आताही जिल्ह्यात कोरोना लॉकडाऊन आणि वळवाच्या पावसाने शेतकऱ्यांना कोंडीत पकडले आहे.

राज्यात बुधवारी रात्रीपासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. अत्यावश्यक कामांसाठीच लोकांना बाहेर पडावं लागत आहे; पण, यामुळे शेतकऱ्यांनाच मोठा सामना करावा लागत आहे. कारण, शेतमाल न्यायचा कोठे हा प्रश्न आहे. बाजार समितीत नेला तर व्यापारी दर पाडत आहेत. कारण, पुढे मालाला उठाव नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मग, किरकोळ विक्री करायची म्हटलं तर आठवडी बाजारही बंद आहेत. त्यामुळे शेतमालाचं करायचं काय? अशा चिंतेत शेतकरी दिसून येत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बांधावर येऊन भाजीपाला घेऊन जाणारा व्यापारी ठरलेल्या दरापेक्षा कमी भावात माल मागत आहे. त्यामुळे घातलेले पैसेही निघणार नाहीत, अशीही स्थिती निर्माण झालेली आहे.

सध्या लॉकडाऊनने शेतमाल कोठे घेऊन जायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच वळवाचा पाऊस आणि गारपिटीने नवे संकट आले आहे. बुधवारच्या पावसात खटाव आणि कोरेगाव तालुक्यांतील काही भागांना चांगलाच दणका बसला. चिकू, पपई, डाळिंब बागांचे नुकसान झाले; तर गारपिटीमुळे कलिंगडाला पालाही शिल्लक राहिला नाही. गारांचा मार बसलेली कलिंगडे आता नासूनच जाणार आहेत; तर कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टोमॅटो पिकालाही पावसाचा दणका बसला आहे. गारांनी टोमॅटो तुटून पडली आहेत. त्यामुळे टोमॅटोचा चिखल होऊन बसला आहे. कांद्याच्या गोटाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हताश होऊन बसला आहे.

एकीकडे लॉकडाऊनमुळे शेतमालाला उठाव नाही. दरही कमी होऊ लागला आहे; तर दुसरीकडे पावसाने हातातोंडाला आलेला घास हिरावून नेण्याचा प्रकार होत आहे. यामुळे शेतकरीवर्ग पिचत चालला आहे, हे निश्चित.

चौकट :

बाजार समितीत घरगुती ग्राहकांची गर्दी...

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, जावळी, कोरेगाव, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. पण, लॉकडाऊनच्या भीतीने माल कमी येऊ लागला आहे. त्यातच दरही कमी झाले आहेत. काही व्यापारी तर शेतकऱ्यांना आता माल आणू नका म्हणूनही सांगत आहेत. त्यामुळे काढणीस आलेला शेतमाल कोठे ठेवायचा हा प्रश्न आहे; तर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सातारा बाजार समिती बुधवारी घरगुती ग्राहकांनी कांद्याची खरेदी केली. त्यामुळे बाजार समितीत गर्दी झाली होती; पण, गुरुवारी कोणीही घरगुती ग्राहक फिरकलाही नाही.

.............................................

कोट :

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये मुंबईतील व्यापाऱ्याकडे मालाचे पैसे अडकले आहेत. ते आजही मिळालेले नाहीत. त्यातच आताही पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला आहे. याचा फटका शेतमाल विक्रीवर होत आहे. व्यापाऱ्यांनी दर पाडायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे माल नेला तर त्याला रास्त भाव मिळेल याची श्वाश्वती नाही. त्यातच वळवाचा पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. शेतकरी अशा दुहेरी संकटात सापडला आहे. यातून कसे बाहेर पडायचे याचाच विचार करण्याची वेळ आली आहे.

- राहुल धुमाळ, शेतकरी, सोनके

फोटो दि.१५ सातारा टोमॅटो फोटो...

फोटो ओळ : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी झालेल्या पावसात टोमॅटोचे मोठे नुकसान झाले.

फोटो दि. १५सातारा कलिंगड फोटो...

फोटो ओळ : गारपिटीमुळे कलिंगडाचा पालाही शिल्लक राहिला नाही. त्यातच गारांच्या माराने कलिंगड नासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

.....................................................................................

Web Title: Pittoy farmers in lockdown round ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.