जागा ६८; उमेदवार साडेचार हजार !
By admin | Published: March 30, 2016 10:15 PM2016-03-30T22:15:20+5:302016-03-31T00:09:11+5:30
पोलिस भरती : पाचशे उमेदवारांची दुसऱ्या दिवशी चाचणी; विविध जिल्ह्यांतून युवक-युवती उपस्थित
सातारा : जिल्हा पोलिस दलात भरतीसाठी दुसऱ्या दिवशी ४९९ उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेण्यात आल्या. दरम्यान, पाच एप्रिलपर्यंत सुरू राहणाऱ्या या भरतीसाठी तब्बल साडेचार हजार उमेदवारांचे अर्ज आले असून, पोलिस शिपायाच्या अवघ्या ६८ जागांमध्ये स्थान मिळविण्यासाठी हे तरुण झुंजत आहेत.
पोलिस दलातील भरतीसाठी मंगळवारपासून (दि. २९) भरतीप्रक्रियेस प्रारंभ झाला. बुधवारी दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता प्रक्रिया सुरू झाली. प्रथम कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप घेण्यात आले. एकूण ५५८ उमेदवार बुधवारी हजर राहिले. त्यातील १४ जण कागदपत्र पडताळणीत तर ४५ जण शारीरिक मोजमापात अपात्र ठरले.
उर्वरित ४९९ उमेदवारांच्या शंभर मीटर धावणे, लांब उडी, पुल-अप्स, गोळाफेक अशा चार चाचण्या घेण्यात आल्या. या उमेदवारांची १६०० मीटर धावण्याची चाचणी गुरुवारी सोनगाव फाटा ते शेंद्रे फाटा रस्त्यावर घेतली जाणार आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. २९) झालेल्या चाचण्यांमध्ये पात्र ठरलेल्या ४९१ जणांना १६०० मीटर धावण्याच्या चाचणीसाठी बुधवारी बोलाविण्यात आले होते.
प्रत्यक्षात ४१८ उमेदवार हजर राहिले, तर ७३ जण अनुपस्थित राहिले. दि. १ रोजी आठशे पुरुष उमेदवारांना पोलिस भरतीसाठी बोलाविण्यात आले आहे.
पोलिस शिपायाच्या जिल्ह्यात ६८ जागा भरावयाच्या असून, त्यातील पुरुषांच्या दोन आणि महिलांची एक अशा तीनच जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. उर्वरित सर्व जागा आरक्षित आहेत. (प्रतिनिधी)