विरोधकांना एक जागा; सत्ताधाऱ्यांचे पॅनेल तयार..

By admin | Published: May 10, 2016 10:25 PM2016-05-10T22:25:48+5:302016-05-11T00:12:22+5:30

२० उमेदवारांची यादी जाहीर : निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरूच--सांगा, जनता बँक कोणाची.. ?

A place for opponents; Construct the powers of the panel .. | विरोधकांना एक जागा; सत्ताधाऱ्यांचे पॅनेल तयार..

विरोधकांना एक जागा; सत्ताधाऱ्यांचे पॅनेल तयार..

Next

सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विरोधकांना एक जागा सोडून सत्ताधाऱ्यांनी २० उमेदवारांचे पॅनेल जाहीर केले आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांना पूर्ण पॅनेल उभे करण्याइतपत उमेदवारच शिल्लक राहिले नसल्याचा दावा सत्ताधारी भागधारक पॅनेलचे प्रमुख अ‍ॅड. मुकुंद सारडा व विनोद कुलकर्णी यांनी केला आहे. विरोधकांकडून निवडणूक लादण्याचा प्रयत्न होत असला तरी शेवटपर्यंत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वसाधारण गटातून विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, जयवंत भोसले, माधव सारडा, आनंदराव कणसे, जयेंद्र चव्हाण, अतुल जाधव, चंद्रशेखर घोडके, अरुणकुमार यादव, रामचंद्र साठे, अविनाश बाचल, रवींद्र माने, सागर लाहोटी, वजीर नदाफ, बाळासाहेब ऊर्फ नारायण लोहार यांची तर महिला राखीवमधून चेतना माजगावकर, सुजाता राजेमहाडिक, अनुसूचित जाती-जमातीमधून विजय बडेकर, इतर मागास प्रवर्गातून अशोक मोने, भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून बाळासाहेब गोसावी यांना भागधारक पॅनेलतर्फे संधी देण्यात आली आहे.
दि. २ जून रोजी जनता सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून या निवडणुकीचे पडघम सातारा शहर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वाजू लागले आहेत. हळूहळू निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. सध्या तरी गेल्या सहा महिन्यांपासून या बँकेतील काही विषय कोर्ट कचेऱ्यांमध्ये जाऊ लागले आहेत. बँकेला उभे राहिलेल्या २७ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले होते, त्यापैकी १८ जणांनी उपनिबंधकांकडे केलेले अपीलही फेटाळण्यात आल्याने त्यांची न्यायालयात जाण्याची तयारी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर भागधारक पॅनेलचे प्रमुख अ‍ॅड. मुकुंद सारडा, चेअरमन विनोद कुलकर्णी, संस्थापक सदस्य बाळासाहेब जाजू, भास्करराव शालगर या चार पॅनेल प्रमुखांनी मंगळवारी भागधारक पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली.
निवडणुकीबाबत बँकेचा जो ५० लाखांचा खर्च होणार आहे, तो खर्च वाचावा आणि बँकेवर निवडणूक खर्चाचा अतिरिक्त बोजा पडू नये, म्हणून ही बिनविरोध करण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांनी केले होते; परंतु विरोधकांनी हे आवाहन धुडकावून लावले आहे. सध्याच्या या परिस्थितीत नाराज मंडळी एकत्रित येऊन पॅनेल उभे करण्याच्या तयारीला लागली आहेत. आता सत्ताधाऱ्यांसमोर तुल्यबळ उमेदवारांचे पॅनेल उभे राहणार का? हे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)


खर्च वाचावा ही भूमिका...
विरोधकांकडे उमेदवारच नसल्याने त्यांची आत्ताच दमछाक झालेली आहे. निवडणुकीसाठी लागणारा ५० लाखांचा खर्च वाचावा, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- अ‍ॅड. मुकुंद सारडा, भागधारक पॅनेल प्रमुख
 

Web Title: A place for opponents; Construct the powers of the panel ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.