‘किसन वीर’च्या भरारीत महिलांचे स्थान आशादायी
By admin | Published: October 26, 2015 11:03 PM2015-10-26T23:03:22+5:302015-10-26T23:03:22+5:30
निशिगंधा वाड : कारखान्यातील महिला मेळाव्यात प्रतिपादन
भुर्इंज : ‘स्त्री सबलीकरण महत्त्वाचे असून, किसन वीर कारखान्याच्या भरारीत महिलांना असलेले स्थान दिलासादायी चित्र आहे. या भरारीला आता कोणीही रोखू शकणार नाही,’ असा विश्वास अभिनेत्री तथा लेखिका डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केला.
येथील किसन वीर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या सभासद महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. नीलिमा भोसले होत्या.डॉ. वाड म्हणाल्या, ‘महिलांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्या एकत्रिकीकरणाला किसन वीरने दिलेले व्यासपीठ महत्त्वाचे आहे. किसन वीरचे कुटुंबप्रमुख मदन भोसले यांनी राबवलेला हा उपक्रम एकमेव असा आहे.’ डॉ. नीलिमा भोसले म्हणाल्या, महिला कर्मचाऱ्यांना संधी देणारा हा पहिला कारखाना आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाची केवळ चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृती होत आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या राजनंदा जाधवराव, संचालिका आशा फाळके, विजया साबळे, अनुराधा भोसले, माजी संचालिका सुनंदा चव्हाण, रंजना फाळके, विजया भोसले, पद्मा भोसले, अल्पना यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.डॉ. नीलिमा भोसले यांनी स्वागत केले. स्रेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, संपूर्ण कार्यक्षेत्रातील महिलांनी या मेळाव्यास उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. सायंकाळच्या सत्रात साहित्यिका अरुणा ढेरे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
उत्स्फूर्त प्रतिसाद -राजकीय मेळावा नसतानाही या मेळाव्यास तब्बल पाच हजार महिलांनी केलेली गर्दी आश्चर्यचकीत करणारी ठरली. मोठ्या संख्येने आलेल्या महिलांची बैठकव्यवस्था करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक महिलांनी उन्हात थांबून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.