..अन् कारमधून निघाला अजगर, कऱ्हाडात थरार; सर्पमित्रांनी केले ‘रेस्क्यू’
By संजय पाटील | Published: August 10, 2023 02:25 PM2023-08-10T14:25:24+5:302023-08-10T14:27:28+5:30
कोकणातून मध्यरात्री कऱ्हाडात पोहोचले. हॉटेलमध्ये जेवून पुन्हा कारमध्ये बसायला गेले, अन्..
कऱ्हाड : कोकणातून कारमधून पुण्याला निघालेले कुटूंब मध्यरात्री कऱ्हाडात पोहोचले. येथील एका हॉटेलात जेवण केल्यानंतर ते पुन्हा कारमध्ये बसायला गेले; पण कारजवळ जाताच त्यांना धक्का बसला. कारमध्ये चक्क एका अजगराने ठाण मांडलेले. अखेर सर्पमित्रांनी धाव घेत अजगराला सुरक्षित पकडले. त्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.
चिपळूणमधील एक कुटूंब कारमधून पुण्याच्या दिशेने निघाले होते. पाटणमार्गे कऱ्हाडातील वारुंजी फाट्यावर आल्यानंतर संबंधित कुटूंबिय तेथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबले. जेवण आटोपल्यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा सर्वजण कारमध्ये बसायला गेले. त्यावेळी चालकाने ‘कुलंट’ तपासण्यासाठी कारचे बोनेट उघडले; पण बोनेट उघडताच सर्वांना धक्का बसला. बोनेटमध्ये चक्क एक अजगर ठाण मांडून बसलेला. या प्रकारामुळे हादरलेल्या संबंधित कुटूंबियांनी हॉटेलच्या सुरक्षारक्षकाला याबाबतची माहिती दिली.
सुरक्षारक्षकाने हॉटेलमधील विशाल विधाते या कर्मचाºयाला त्याठिकाणी बोलवले. विशालने तातडीने याबाबतची माहिती सर्पमित्र उदित कांबळे यांना दिली. सर्पमित्र कांबळेही मध्यरात्री त्याठिकाणी धावून गेले. त्यांनी कारमधून सुरक्षितरीत्या त्या अजगराला बाहेर काढून एका पोत्यात ठेवले. तसेच याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी अजगराला ताब्यात घेऊन मध्यरात्रीच जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
या घटनेनंतर संबंधित कुटूंब पुन्हा कारमध्ये बसण्यासही घाबरत होते. मात्र, सर्पमित्र उदीत कांबळे यांच्यासह इतरांनी सर्व कार तपासून त्यामध्ये दुसºया कोणत्याच जागी सर्प नसल्याची खात्री करुन घेत संबंधित कुटूंबियांना निर्धास्त केले. त्यानंतर ते कुटूंबिय पुढील प्रवासाला मार्गस्थ झाले.
कऱ्हाडात पहिल्यांदाच आढळला अजगर
कऱ्हाडात अनेक सर्पमित्र कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध जातीचे सर्प शहरासह परिसरातून पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. मात्र, आजपर्यंत कऱ्हाडात अजगर जातीचा सर्प आढळून आला नव्हता. अजगर आढळल्याची कऱ्हाडातील ही पहिलीच घटना असल्याचे सर्पमित्र उदीत कांबळे, योगेश शिंगण यांनी सांगीतले.