योजना निराधारासाठी की छळण्यासाठी ?
By admin | Published: September 4, 2014 11:44 PM2014-09-04T23:44:14+5:302014-09-05T00:19:15+5:30
पाटण : अधिकारी म्हणतात मंजूर नाही; लाभार्थी दाखवितात पत्र
पाटण : शासनाच्या योजना नागरिकांसाठी असतात पण त्या कशा राबवितात त्यावर त्या योजनेचे यश-अपयश अवलंबून असते. अशाप्रकारे पाटण तालुक्यात कारभार सुरू आहे. याचे उदारहण म्हणजे, संजय गांधी निराधार योजना. पाटण तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागातील अधिकारी, कर्मचारी तुमची प्रकरणे मंजूर नाहीत, असे लाभार्थ्यांना सांगत आहेत. तर लाभार्थी अनुदान मंजूर झाल्याचे पत्र दाखवत आहेत. तरीही याची दखल घेतली जात नाही, हे विशेष आहे.
भाजपच्या महिला आघाडीच्या पाटण अध्यक्षा आयेशा सय्यद म्हणल्या, संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी निराधार असणाऱ्या महिलांना अर्वाच्च भाषेत व उध्दटपणे बोलत आहेत. निराधार योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाबाबत टोलवाटोलवी करतात. दिवसभर लोकांना कार्यालयाच्याबाहेर ताटकळत ठेवतात. तुमची प्रकरणे मंजूर करायची की नाही हे मीच ठरविणार, अशी दमबाजी करण्यात येत आहे. या दमबाजीला घाबरून निराधार, गरीब महिला अनुदान मिळावे म्हणून सर्व सहन करतात.
संजय गांधी निराधार योजना, वृध्दापकाळ योजना, विधवा निवृत्तीवेतन, अपंग योजना अशा योजनांपासून अनेकांना दूर रहावे लागत आहे. (प्रतिनिधी)