योजनांची पत्रके पंचायतीच्या भिंतीवर..!

By Admin | Published: January 1, 2017 10:48 PM2017-01-01T22:48:49+5:302017-01-01T22:48:49+5:30

कऱ्हाड पंचायत समितीचा कारभार : नोटीस बोर्डअभावी पोस्टर चिटकवले; सभापतींसह सदस्य, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Plans are on the walls of the Panchayat ..! | योजनांची पत्रके पंचायतीच्या भिंतीवर..!

योजनांची पत्रके पंचायतीच्या भिंतीवर..!

googlenewsNext

कऱ्हाड : अनेक पुरस्कार मिळविलेल्या कऱ्हाड पंचायत समितीमध्ये सभापती व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सध्या लाभार्थ्यांना भेटण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला नोटीस बोर्डही काढून टाकला असल्याने योजनांची पत्रके भिंतीवर लावून प्रसिद्धी केली जात आहे. योजनांची माहिती त्याबाबचा संदेश द्यायचा कुणाकडे? असा प्रश्न पडला असताना एका लाभार्थ्याने चक्क सभापतींच्या नावेच पत्र लिहिले आहे. तेही येथील कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर लावले आहे.
शासनाच्या नव्या योजना काटेकोरपणे ग्रामीण भागात राबवून त्यांची नियमित प्रसिद्धी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. त्यानुसार ‘शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती द्या व योजनांची जास्तीत जास्त प्रसिद्धी करा,’ अशा जिल्हा परिषदेकडून सूचना देण्यात येऊनही त्याचा विसर सध्या कऱ्हाड पंचायत समितीला पडलेला दिसून येत आहे.
नागरिकाने पत्र लावले आहेत. त्या शेजारीच आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती देणारे फलक धूळखात पडून राहिले आहेत. मात्र, ते दर्शनी भागात लावण्याची तसदी सुद्धा साधी येथील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही. त्यामुळे योजना असूनही त्यांची प्रसिद्धी अधिकाऱ्यांकडूनच केली जात नसल्याने लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना कधी पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करणे गरजेचे असते. ते अधिकाऱ्यांचे कर्तव्यच असते. एखादी महत्त्वाची माहिती अथवा शिबिराची माहिती देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात नोटीस बोर्ड ठेवण्यात आलेले असते. त्या नोटीस बोर्डावर नव्या योजना, अद्यादेश, तसेच महत्त्वाची माहितीचे तयार करण्यात आलेले सूचनापत्र चिकटवले जाते. जेणेकरून या ठिकाणी कामासाठी तसेच माहिती मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना, नागरिकांना ते माहिती होऊ शकेल. मात्र, येथील पंचायत समितीमध्ये योजना या फक्त नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कारण पंचायत समितीच्या इमारतीमध्ये प्रवेशद्वारावरील नोटीस बोर्ड हे काढून ठेवण्यात आले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग या विभागामध्ये नव्या योजना नेहमी येत असतात. मात्र, त्याची प्रसिद्धी ही मासिक सभेशिवाय दिली जात नाही. शिवाय नव्या योजनांचे एकही फलक हे लावले जात नाहीत. त्यामुळे योजना कधी आल्या आणि कधी निघून गेल्या याची माहिती देखील या ठिकाणी येणाऱ्या सदस्यांना व नागरिकांना मिळत नाही. आता तर कऱ्हाड पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेले नोटीस बोर्डच काढून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे माहिती फलक, नोटिसा भिंतीवरच लावत आहेत. (प्रतिनिधी)

दुपारनंतर अधिकारी गायब...
कऱ्हाड पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची कामाची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी आहे. मात्र, या ठिकाणी दुपारी एक वाजले की अधिकारी बाहेर निघून जातात. ते परत दुपारी पाच वाजल्यानंतरच परत
येतात. कामाचे निमित्त सांगून अधिकारी नेमके जातात कुठे हा मात्र संशोधनाचा विषय आहे, अशी चर्चा आहे.
स्वागत कक्षही नाही...
कऱ्हाड पंचायत समितीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी स्वागत कक्ष उभारण्याची गरज आहे. तसेच नागरिकांना नव्या योजनांची तसेच महत्त्वपूर्ण लागणाऱ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी स्वागत कक्ष उभारणे गरजेचे आहे. मात्र, तोही अद्याप या ठिकाणी उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी एखादी व्यक्तीसमोर कोणता विभाग कोठे आहे. आणि कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे, असा प्रश्न निर्माण होतो.

Web Title: Plans are on the walls of the Panchayat ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.