विलगीकरण कक्षाचे स्वच्छतेबरोबरच वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:52+5:302021-06-09T04:48:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागठाणे : कोरोना अहवाल बाधित आल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. तर काही जण फार त्रास होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागठाणे : कोरोना अहवाल बाधित आल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. तर काही जण फार त्रास होत नसला तरी चौदा दिवस अंथरून धरून बसतात. पण जांभळेवाडी येथील हर्षल भातुसे याने यातलं काहीच केलं नाही. या काळात त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेत तयार केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले. तेथे त्याने शाळेची स्वच्छता करणे, परिसरात झाडे लावून इतरांनाही सकारात्मक ऊर्जा दिली.
याबाबत माहिती अशी की, जांभळेवाडी येथील हर्षल उमेश भातुसे हा चौदा वर्षीय मुलगा नववीत शकतो. त्याचे वडील उमेश भातुसे हे देशसेवेत दिल्ली येथे कर्तव्य बजावत आहेत. कुटुंबासोबत सुटी काढून गावाला आले. त्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात राहावे लागले. त्यानंतर पुन्हा चाचणी करून घरी जाताना हर्षलचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला जिल्हा परिषदेच्या जांभळेवाडी शाळेत चौदा दिवसांसाठी क्वारंटाइन केले गेले.
या वेळी हर्षलने चौदा दिवसांचा वेळ सत्कारणी लावत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील संपूर्ण परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली. हे काम संपल्यानंतर शाळेच्या आवारात विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे लावून रोज झाडांची निगा राखणे, पाणी देणे, परिसर रोज स्वच्छ करणे व सॅनिटायजर फवारणी करणे असा दिनक्रम सुरू ठेवला.
वडिलांप्रमाणेच समाजसेवा
वडील देशाची सेवा करतात मग आपणही सामाजिक काम करावे. वेळ वाया घालवण्यापेक्षा चांगल्या कामासाठी आपला वेळ सार्थकी लागावा. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, हे काम सर्वानी केले पाहिजे. त्यामुळे आपण हे काम करण्याचे ठरवले, असे हर्षल सांगतो.
०६नागठाणे-स्टोरी
सातारा तालुक्यातील जांभळेवाडी येथे विलगीकरण कक्षात ठेवलेल्या हर्षल भातुसे याने शाळा परिसरात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धनही केले.