पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण गरजेचे
By admin | Published: May 12, 2016 10:24 PM2016-05-12T22:24:23+5:302016-05-12T23:55:13+5:30
वेदांतिकाराजे भोसले : कर्तव्य सोशल ग्रुपच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन
सातारा : ‘जागतिक तापमान वाढ, पर्जन्यमानात घट, गारपीट, अतिवृष्टी, भीषण दुष्काळ यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपतर्फे वृक्षलागवड मोहित राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी व्हावे,’ असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. वेदांतिकाराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे. तीव्र उन्हाळा आणि पाणीटंचाईमुळे मानवासह पशु पक्ष्यांनाही संकटाचा सामना करावा लागत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. बिकट परिस्थितीपासून वाचण्यासाठी पर्यावरण रक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन हाच एकमेव पर्याय आहे. त्याबरोबरच कचरा निर्मूलनही महत्त्वाचे आहे. कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून निसर्ग रक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत. वेळोवेळी वृक्षारोपण करण्यात आले आहे.
कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून समाज मंदिर, खुल्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. झाडे लावल्यानंतर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी कर्तव्य सोशल ग्रुप सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.
भीषण दुष्काळाला आपणच जबाबदार आहोत. यातून आपणच मार्ग काढून दुष्काळावर मात करण्यासाठी निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. त्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्यासाठी अमर मोकाशी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळाचे संकट पुन्हा ओढावू नये, अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. मात्र, मी एकटा काय करणार, अशा भावनेने ही इच्छा मनातच राहून जाते. तोच प्रकार कचऱ्याच्याबाबतीतही होतो. कोणीतरी कचरा रस्त्यावर, ओढ्यात टाकताना आपण पाहतो. त्याचा रागही येतो. हे सर्व थांबावे, अशीच इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. इच्छेला मनात न ठेवता प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याची नितांत गरज आहे.
वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि कचरा निर्मूलनाची सुप्त इच्छा प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करण्याची वेळ आली आहे. सर्वांनीच सामाजिक जबाबदारी म्हणून सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे. येत्या जून महिन्यापासून कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून निसर्ग रक्षणासाठी वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत एकट्याने किंंवा ग्रुपने, विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, बचत गट, शाळा-महाविद्यालयांनी सहभागी होणे आवश्यक आहे.