भीमनगर स्मशानभूमीत ५० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:33+5:302021-06-09T04:48:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड काळात प्राणवायूची गरज अधोरेखित झाली आहे. पर्यावरणात प्राणवायू मुबलक प्रमाणात मिळविण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविड काळात प्राणवायूची गरज अधोरेखित झाली आहे. पर्यावरणात प्राणवायू मुबलक प्रमाणात मिळविण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन कोरेगाव तालुक्यातील भीमनगर गावच्या स्मशानभूमीत तब्बल ५० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी) पुणे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात समतादूत प्रकल्पाच्या अंतर्गत ५ जून ते २० जून पर्यंत लक्षावधी वृक्षांची लागवड करून वृक्षरोपण पंधरवडा साजरा करण्याची संकल्पना आणि आदेश बाटीर्चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिले आहेत. प्राणवायू विना प्राण जाण्याच्या संकटाला आज जग सामोरं जात असताना प्राणवायू विना कोणाचाही प्राण जाऊ नये या उदात्त हेतूने संपूर्ण महाराष्ट्रातील साडेतीनशे समतादूत यांच्या माध्यमातून लाखो वृक्षांचे रोपण करून निसर्ग संवर्धनाचा वसा आणि वारसा जपण्याच्या हेतूने समाज हिताचा हा उपक्रम राबवत आहे.
कोरेगाव तालुक्यामधील भीमनगर या गावी सरपंच सुरेश कांबळे, आरपीआय गवई गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव चंद्रकांत कांबळे, रफीक इनामदार, दीपक कदम, नितीन रोकडे, गुणाजी कांबळे, अमोल ससाने, अशोक कदम, जनार्दन कांबळे, मयूर ससाने, सुरेश कांबळे, स्वप्निल कांबळे व समतादूत विशाल कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमनगर येथील स्मशानभूमीमध्ये ५० वृक्षांची लागवड करण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने झाले. समतादूत विशाल कांबळे यांनी सातारा जिल्ह्यातून जास्तीत-जास्त हजारोंच्या संख्येने वृक्षारोपण करून बार्टीने सोपवलेल्या या आनंददायी कामाचा आनंद घेऊन लोकांचा आनंद द्विगुणित करण्याचा मानस व्यक्त केला. या सर्व प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे यांचे सहकार्य लाभले.
..................