१२ हेक्टर क्षेत्रात ७ हजार २०० वृक्षांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 10:50 PM2018-07-01T22:50:00+5:302018-07-01T22:50:26+5:30
सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग १३ लाख २५ हजार झाडे लावणार असून, त्यादृष्टीने नियोजनही केले आहे.
सातारा : वनविभागामार्फत खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवथर येथील रोपवन क्षेत्रात वृक्ष लागवड करून १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यात
आला.
यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, डॉ. बुधाजीराव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील, शिवथरच्या सरपंच मीना गुरव आदी उपस्थित होते.
शिवथर येथील वनविभागाच्या १२ हेक्टर क्षेत्रात रविवारी सकाळपासून ७ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, उंबर, बेल, जांभूळ, आवळा, चिंच आदी वृक्षांचा यामध्ये समावेश आहे. कार्यक्रमाच्या प्रांरभी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी उपस्थितांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. त्यानंतर ते म्हणाले, ‘२०१८ च्या पावसाळ्यात २३ लाख वृक्ष लागवडीचे सातारा जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये १३ लाख २५ हजार वन विभागाचे उद्दिष्ट असून, वन विभागाकडून १७ लाख
वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले.
१ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत अंगणात, मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्यांच्या कडेला, गायरानानवर, गावठणात वृक्ष लागवड करावी आणि प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करून संवर्धन करावे, असे आवाहनही अंनजकर यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास शिवथर येथील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.