प्लास्टिक पिशव्यांचा बाजारपेठेत बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:47+5:302021-01-22T04:35:47+5:30
सातारा : प्लास्टिक पिशव्यांची विक्री व त्यांच्या वापरावर निर्बंध असताना साताऱ्यात मात्र उलट चित्र दिसू लागले आहे. शहरातील जवळपास ...
सातारा : प्लास्टिक पिशव्यांची विक्री व त्यांच्या वापरावर निर्बंध असताना साताऱ्यात मात्र उलट चित्र दिसू लागले आहे. शहरातील जवळपास ९० टक्के हातगाडीधारक प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करत आहेत. पालिकेकडून गेल्या दीड वर्षात एकही कारवाई न झाल्याने या विक्रेत्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही.
प्लास्टिक वापरण्यास सुलभ असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो; परंतु प्लास्टिकचं विघटन होण्यास बराच काळ लागतो. शिवाय पर्यावरणाची देखील हानी होते. त्यामुळे शासनाने राज्यात २३ जून २०१८ रोजी प्लास्टिक बंदी कायदा लागू केला. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली.
सातारा पालिकेने प्रारंभीचे काही महिने शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम प्रभावीपणे राबविताना शेकडो व्यापारी, दुकानदार व हातगाडीधारकांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, ही मोहीम थंडावताच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली. शहरात फळ व खााद्यपदार्थांच्या गाड्या तीन हजारांहून अधिक आहेत. आलेला ग्राहक माघारी जाऊ नये यासाठी गाड्यांवर प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. दोन महिन्यांपासून हा प्रकार वाढला असून, पालिका प्रशासनाचे अद्यापही या बाबीकडे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे ‘प्लास्टिक पिशव्या जोमात पालिका कोमात’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.
(चौकट)
आधी खिशात..आता गाड्यावर
लॉकडाऊनपूर्वी संबंधित विक्रेते कारवाईच्या भीतीचे प्लास्टिक पिशव्या खिशात लपवून ठेवत होते. ग्राहकांकडून मागणी झाल्यास त्याला प्लास्टिक पिशवीतून फळे व भाजीपाला दिला जात होता. आता मात्र कारवाईच बंद झाल्याने या पिशव्यांचा खुलेआम वापर व विक्री सुरू झाली आहे.
(चौकट)
या ठिकाणी सर्रास वापर
शहरातील महात्मा फुले भाजी मंडई, जुना मोटर स्टॅँड, प्रतापगंज पेठ, राजवाडा, गोलबाग, मंगळवार तळे मार्ग, तहसील कार्यालय, बसस्थानक परिसरातील फळ, भाजी विक्रेते व खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे.
(कोट)
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी हातगाडीधारकांनी देखील योगदान द्यावे. संबंधितांनी प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर बंद करावा. अन्यथा प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील.
- माधवी कदम, नगराध्यक्षा
फोटो : २१ जावेद १८
सातारा शहरातील फळ व भाजी विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर केला जात आहे. (छाया : जावेद खान)