सातारा : प्लास्टिक बंदीचा 5 व्यापा-यांना दणका, प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 03:55 PM2018-06-23T15:55:13+5:302018-06-23T15:56:51+5:30
राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मोहीमेचा साता-यातील पाच व्यापा-यांना फटका बसला.
सातारा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या प्लास्टिक बंदी निर्णयाची अंमलबजावणी सातारा जिल्ह्यात काटेकोरपणे सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या मोहीमेचा साता-यातील पाच व्यापा-यांना फटका बसला. प्लास्टिक बॅग व साहित्याची विक्री करणा-या या व्यावसायिकांवर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी पाच हजारांचा दंडही ठोठविण्यात आला आहे. प्लास्टिकमुळे निर्माण होणारी पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी शासनाने शनिवार (२३ जून) पासून राज्यभर प्लास्टिकबंदी लागू केली आहे. या अंतर्गत
विविध प्रकारच्या प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात आली आहे.
प्लास्टिकबंदी निर्णयाच्या पहिल्याच दिवशी पालिकेच्या अतिक्रमण व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने शहरात कार्यवाही सुरू केली. या मोहीमेत प्लास्टिक पिशव्या व तत्सम वस्तूंची विक्री करणारे साता-यातील पाच व्यावसायिक आढळून आले. यामध्ये एक चिकन सेंटर, कारंडे शू मार्ट, दुकानदार राजेंद्र बेंद्रे, मोमीन अॅण्ड सन्स, शू-किंग या पाच व्यावसायिकांचा समावेश आहे. या व्यावसायिकांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची नोटीस बजाविण्यात आली आहे. पालिकेच्या या पथकाने मोती चौक, रविवार पेठ, गुरूवार परज, पोवई नाका, मल्हारपेठ आदी ठिकाणी कारवाई केली.