प्लास्टिक स्पीडब्रेकरने घेतला ‘ब्रेक’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:36 PM2017-10-04T14:36:58+5:302017-10-04T14:38:27+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी पाचगणीच्या रस्त्यावर बसविण्यात आलेले प्लास्टिक स्पीडब्रेकर गायब होत चालले असून, काही ठिकाणी तर स्पीड ब्रेकरनेच ‘ब्रेक’ घेतल्याचे दिसत आहे. आता रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहनांचे वेगही वाढले आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
पाचगणी , 4 : गेल्या काही दिवसांपूर्वी पाचगणीच्या रस्त्यावर बसविण्यात आलेले प्लास्टिक स्पीडब्रेकर गायब होत चालले असून, काही ठिकाणी तर स्पीड ब्रेकरनेच ‘ब्रेक’ घेतल्याचे दिसत आहे. आता रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहनांचे वेगही वाढले आहेत. त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
शहराच्या विविध भागांतील महत्त्वाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी प्लास्टिक स्पीड ब्रेकर्स पालिकेकडून बसविण्यात आले होते. मात्र, मुदत संपण्यापूर्वीच हे स्पीड ब्रेकर खराब झाले आहेत. तर काही ठिकाणी गायबच झाले आहेत. पालिकेच्या निधीतून हे काम पूर्ण झाले आहे. परंतु देखभालअभावी येथील सर्व स्पीड ब्रेकर्सची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास येत आहेत.
त्यामुळे दुचाकीस्वार व इतर वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याचे दिसत आहेत. त्याच बरोबर या परिसरात शाळा, महाविद्यालये व बाजारपेठ असल्याने आजूबाजूच्या गावातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, नोकरदार वर्गाचे ये-जा चालू असते.
पाचगणी रस्त्यावरील वाढती रहदारी व संभाव्य अपघातांची समस्या विचारात घेऊन संबंधित ठेकेदारास स्व:खर्चाने पुन्हा प्लास्टिक स्पीड ब्रेकर्स बसवून देण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांच्याकडे भारत अगेन्स्ट भ्रष्टाचारचे प्रदेश सचिव दीपराज गायकवाड यांनी केली आहे.