निसर्गाशी खेळणे बेतू शकते तरुणांच्या जीवावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:09 AM2021-07-13T04:09:15+5:302021-07-13T04:09:15+5:30
पेट्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असतानाही तरूणाईचा घोळका यवतेश्वर, कासला मोठ्या संख्येने येत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुकवर डिस्प्ले पिक्चर, ...
पेट्री : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद असतानाही तरूणाईचा घोळका यवतेश्वर, कासला मोठ्या संख्येने येत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुकवर डिस्प्ले पिक्चर, प्रोफाईल पिक्चरसाठी धोकादायक ठिकाणी बेभान होऊन थ्रील करत सेल्फी करण्यात मग्न होत आहे. तरूणाईला आपल्या डीपीवरील छायाचित्राचे इतरांकडून कौतुक व्हावे, असे वाटत आहे. डीपी सर्वांपेक्षा वेगळा कसा असेल? यासाठी फोटोसेशन करताना धोका पत्करला जात आहे.
समाजमाध्यमांवर आपली वेगवेगळी छायाचित्रे काढून टाकण्याची जणू क्रेझच सुरू झाली आहे. अनेकविध पोझ देऊन सेल्फी, फोटोसेशन करण्याकडे अधिक कल दिसतो. यवतेश्वर घाटात कठड्यावर उभे राहून, धोकादायक वळणांवर वाहतुकीच्या रस्त्यावर आडवे पडून, गणेशखिंडीत मोठी खोली असणाऱ्या कसलाही आधार नसणाऱ्या उंच कड्यांवर तरूणाई आपल्या मित्रांसमवेत फोटो काढत असते. कास तलावाच्या किनाऱ्यावर दुचाकी उभी करून वाहनांची रेस वाढवून पाण्याचे तुषार कॅमेऱ्यात टिपणे, कासच्या सांडव्यावर उभे राहून फोटोसेशन अशाप्रकारे बेभान होऊन आपण सुरक्षित आहोत की नाहीत, याचे जरादेखील भान तरूणाईला राहत नाही. जीव धोक्यात घालून आगळावेगळा डिस्प्ले पिक्चर डाऊनलोड करण्यासाठी गुंग होत आहेत. ठिकठिकाणी निसरड्या जागा, घाटात अधिक खोलीच्या कठडयांवर आधाराविना वैयक्तिक, सामूहिक सेल्फी-फोटोसेशनमुळे तोल न सावरल्यास, अनभिज्ञ जागांचा अंदाज न आल्यास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
या मार्गावर धोकादायक वळणे आहेत. अवजड मालाची वाहतूक, दुचाकी, चारचाकी सुसाट धावत असताना तरूणाई जीवाची पर्वा न करता रस्त्यात झोपून तसेच आपली दुचाकी भररस्त्यात उभी करून विविध अँगलने क्षण कॅमेऱ्यात टिपत असते. ठिकठिकाणच्या धोकादायक वळणांवर अचानक गाड्या समोर येण्याचे प्रकार घडत आहेत. स्टंट करत अविवेकीपणाने गाड्यांचा वेग वाढवून जाग्यावर वळवणे, गाडीची उड्डाण घेऊन तरूणाईला आपण साहस करतो आहोत, असे वाटते.
कोट
स्टंट करण्याकडे तरूणाईचा कल जास्त असून, स्वतःबरोबर इतरांचाही जीव ते धोक्यात घालत आहेत. हुल्लडबाजी, स्टंटमुळे इतरांना अडचण निर्माण होत असून, आपण सेफ आहोत, या अविर्भावात राहून तरूणाईला सेल्फी काढणे धोकादायक ठरू शकते.
- मायचंद पवार, सातारा
पॉईंटर/
धोका!
यवतेश्वर घाटातील कठड्यांवर उभे राहणे.
झऱ्यासमोरील मोठ्या खडकांवर उभे राहणे.
गणेशखिंडीतील खोलवर कड्यांवर उभे राहणे.
धोकादायक वळणावर रस्त्यात आडवे पडणे-बसणे.
झाडावर चढणे.
कास तलावाच्या सांडव्यावर उभे राहणे, किनाऱ्यावर गाडी उभी करणे.
चालू वाहनांवर उभे राहून मोबाईल स्टीकद्वारे फोटोसेशन.
फोटो १२कास-सेल्फी
साताऱ्याला पाणी पुरवठा करत असलेला कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तरीही अनेक तरुण जीव धोक्यात घालून सांडव्यावर फोटो काढत असतात. (छाया : सागर चव्हाण)
(छाया -सागर चव्हाण)