फ्यूजबॉक्सची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:38 AM2021-01-20T04:38:49+5:302021-01-20T04:38:49+5:30
उंब्रज : तासवडे ते कऱ्हाड मार्गावर रस्त्याकडेला अनेक ठिकाणी असलेले फ्यूजबॉक्स उघडे पडलेले आहेत. काही ठिकाणी हे बॉक्स अक्षरश: ...
उंब्रज : तासवडे ते कऱ्हाड मार्गावर रस्त्याकडेला अनेक ठिकाणी असलेले फ्यूजबॉक्स उघडे पडलेले आहेत. काही ठिकाणी हे बॉक्स अक्षरश: जमिनीला टेकले आहेत, तर काही ठिकाणी फ्युजाही गायब झाल्या असून, तारांवर खेळ सुरू आहे. वीज वितरणने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
श्वानांचा उपद्रव
कुसूर : कोळे (ता. कऱ्हाड) परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांत अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हातगाडे वाढले
कऱ्हाड : येथील बाजारपेठ मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरस्त्या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विक्रेत आपले हातगाडे घेऊन बाजारपेठेतील रस्त्यावर घुसत आहेत. अनेकजण रस्त्यातच हातगाडा उभा करून व्यवसाय करीत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बेशिस्त हातगाडे उभा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
भाजी रस्त्यावर (फोटो : १९इन्फोबॉक्स०२)
कऱ्हाड : येथील मुख्य पोस्ट कार्यालय रस्त्यावर बसून भाजी विक्रेत्यांकडून व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पालिकेतर्फे संभाजी भाजी मंडईत जागा देऊनही तेथे विक्रेते बसत नाहीत. मुख्य पोस्ट कार्यालय रस्त्यावर बसूनच ते व्यवसाय करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.