कमानींची दुर्दशा, उरलाय फक्त सांगाडा!--कऱ्हाड फोकस
By admin | Published: December 6, 2015 10:52 PM2015-12-06T22:52:31+5:302015-12-07T00:27:56+5:30
शहरातील स्थिती : कमानींच्या डागडुजीकडे पालिकेचे दुर्लक्ष; दिशादर्शक नसल्याने प्रवाशांची दिशाभूल
संतोष गुरव-- कऱ्हाड शहरात असलेल्या स्वच्छतेवरून तसेच चांगल्या रस्त्यांवरून शहारातील विकास किती प्रमाणात झाला आहे हे समजते. शहरातील सौंदर्याला सध्या अवकळा ठरणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे २००० सालादरम्यान पालिकेकडून शहरात तीन ठिकाणी रस्त्यावर बांधण्यात आलेल्या तीन कमानी होय. अनोळखी प्रवाशांना जाण्यासाठी ठिकाणांच्या दिशांची माहिती देण्यात यावी व शहरातील सौंदर्यात भर पडावी, या उद्देशाने पालिकेतर्फे तीन कमानी बांधण्यात आल्या. या कमानींची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. डागडुजीअभावी या कमानींचा फक्त सांगाडाच उरला आहे.
कऱ्हाड शहरात सध्या तहसील कार्यालय इमारत, तालुका पोलीस स्टेशन, दिवंगत यशवंतराव चव्हाण सभागृह, बहुद्देशीय केंद्र आणि स्वागत कमान अशी कामे केली जात आहेत. या कामांमुळे शहराचे नावलौकिक वाढणार असून, सौंदर्यात भरही पडणार आहे, अशी महत्त्वाची कामे सुरू असताना पालिकेकडून मात्र शहरातील तीन आकर्षक कमानींकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पंधरा वर्षांपूर्वी शहरातील शाहू महाराज चौक, बसस्थानक परिसर तसेच पोपटभाई पेट्रोलपंप मार्ग या ठिकाणी बांधण्यात आलेल्या लोखंडी कमानींची सध्या दुरवस्था झाली आहे. कमानींवर लावण्यात आलेले दिशादर्शक, सूचना फलक हे फाटून गेले असून, कमानीला गंज चढला आहे. गंजलेल्या कमानीकडे व फाटलेल्या फलकांकडे पाहिल्यास प्रवाशांतून व नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिकेकडून शहरातील सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पालिकेच्या कामाबाबत व वाभाडे नागरिकांकडून काढले जात आहेत. शहरातील सुशोभीकरणासाठी पालिकेकडून दरवर्षी वार्षिक अंदाजपत्रकात ठराविक रकमेची तरतूद केली जाते. आकर्षक फुलझाडे, स्वच्छता संदेशाचे फलक तसेच आकर्षक कमानी यांचा समावेश सुशोभीकरणात येतो, अशी विविध कामे पालिकेकडून शहरात करणे अपेक्षित असते; मात्र कऱ्हाड शहरात पालिकेकडून यापैकी एकही गोष्ट वर्षभरात करण्यात आलेली नसल्याने याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील शाहू महाराज चौक , बसस्थानक मार्गावरील मुख्य रस्ता व पोपटभाई पेट्रोलपंप परिसरात अशा तीन ठिकाणी तीस फूट उंचीच्या तीन आकर्षक लोखंडी कमानी पालिकेने बांधल्या आहेत. मजबूत व टिकावू अशा लोखंडाचा वापर करून बसविण्यात आलेल्या या कमानीला सुरुवातील आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली होती. तसेच या कमानीवर सोलापूर, पंढरपूर, विटा, सह्याद्री कारखाना, मसूर, कोरेगाव या मार्गाची नावे टाकण्यात आली होती. तसेच स्वच्छतेच्या संदेशाचे सूचना फलकही लावण्यात आले होते. सध्या मात्र, हे सूचना फलक फाटले असून, कमानींनाही गंज चढला आहे. कमानी उभारण्यात आल्यानंतर पंधरा वर्षांत पालिकेकडून कितीवेळा कमानींची डागडुजी व रंगकाम करण्यात आले याचे संशोधन करण्याची गरज आहे. शहरातील दुरवस्थेत असलेल्या कमानींची लवकरात लवकर डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
या ठिकाणी कमानींची आवश्यकता
शहरात प्रवेश करण्यासाठी मुख्य तीन मार्ग आहेत. ते म्हणजे कोल्हापूर नाका, कृष्णा नाका आणि कार्वे नाका होय. या ठिकाणांतूनच शहरात प्रवेश केला जातो. सध्या कृष्णा नाका व कार्वे नाका येथे पालिकेकडून आकर्षक कमान उभारणे गरजेचे आहे. मात्र, सध्या कोल्हापूर नाका या ठिकाणी पालिकेने स्वागत कमान उभारली आहे.