भूखंडांचं श्रीखंड..घरपट्टीसाठी आदळआपटी
By admin | Published: February 4, 2016 01:06 AM2016-02-04T01:06:39+5:302016-02-04T01:10:06+5:30
पालिका सभा : ‘करंजे’साठी दुसरी समिती नेमण्याचा ठराव एकमताने मंजूर
सातारा : सातारा पालिकेच्या करंजे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या ४३ भूखंडधारकांची मुदत संपल्याने हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी पालिकेच्या सभेत नगराध्यक्ष विजय बडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी
स्थापन करण्याचा निर्णय झाला. तसेच या समितीने तीन महिन्यांच्या आत यावर अहवाल सादर करून करंजे
येथील भूखंडाचा प्रश्न निकाली काढण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, याच भूखंडाबाबत पूर्वी कमिटी स्थापन करण्यात आली होती; परंतु या समितीचा अहवाल काय होता, त्या समितीने काय केले, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला.
नगरसेवक जयेंद्र चव्हाण म्हणाले, ‘देर आये दुरुस्त आये,’ असं म्हटलं तरी हरकत नाही. करंजे भूखंडाबाबत निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे. प्रशासनाच्या विरोधात जनतेच्या भावना तीव्र आहेत. भूखंडाबाबत केवळ चर्चा होते; मात्र पुढे काहीच होत नाही. शहराला बकालपणा येत आहे. कुठल्याच कामाचा पाठपुरावा केला जात नाही. केवळ करंजे भूखंडाचा इथे प्रश्न नसून शहरातील सर्व जागांचा अहवाल सादर करावा.’
अॅड. दत्ता बनकर यांनी करंजे भूखंडावर सध्या सुरू असलेला अनागोंदी कारभारच सभागृहासमोर मांडला. ते म्हणाले, ‘या भूखंडावर सात आरसीसी इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यांनी कोणाचीही परवानगी घेतली नाही. करार केव्हा केला, याची तारीख नाही.
करारनाम्यामध्ये विसंगती आहेत. या जागेवर ५० प्लॉट, २३ भाडेकरू आहेत. अशी एकूण ५० हजार ९०० चौरस फूट जागा भाड्याशिवाय आपण देतो. या भूखंडात धीरज झवंर, अशोक झंवर, मोहन इंगवले, सलीम कच्छी, कांतिलाल आग्रवाल यांचा ही समावेश आहे,’ असेही बनकर यांनी सांगितले.
नगरसेवक रवींद्र पवार, विरोधी पक्षनेते अॅड. बाळासाहेब बाबर, अविनाश कदम आदींनी भूखंडावर मते मांडली. (प्रतिनिधी)