‘पीएम जन-मन’ आणणार कातकरी समाजात समृद्धीची पहाट, सातारा जिल्हा परिषदेकडून सर्वेक्षण
By नितीन काळेल | Published: January 11, 2024 05:41 PM2024-01-11T17:41:01+5:302024-01-11T17:41:14+5:30
जिल्ह्यातील ८४५ कुटुंबाना मूलभूत सुविधांचा लाभ
सातारा : जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांत ‘प्रधानमंत्री जन मन’ योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ८४५ कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. आता त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत दि. १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या लाभार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत हे विशेष.
याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली. त्यानुसार आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी जनजाती आदिवासी न्याय महाअभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने प्राधान्यक्रमाने घेतला आहे. यासाठी गेल्यावर्षी १५ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री जनमन’ या अभियानाचा शुभारंभही करण्यात आला आहे. या अभियानादरम्यान सातारा जिल्ह्यात ९ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ८४५ कातकरी कुटुंब वास्तव्यास असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
या सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांना आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, आयुष्यमान भारत, आरोग्य कार्ड, जातीचा दाखला, घरकुल, रस्ते, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन अविरतपणे प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे.
दरम्यान, या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यातील ८४५ लाभधारक कुटुंबांशी दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाच्यावतीनेही मेढा, ता. जावली येथील एका मंगल कार्यालयात ऑनलाईन कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. तसेच कार्यक्रमासाठी पात्र लाभधारक कुटुंबांनीही उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आलेले आहे.