जकातवाडी होणार कवितांचे गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 11:27 PM2018-12-31T23:27:07+5:302018-12-31T23:27:20+5:30
सातारा : शहराच्या जवळच असलेले जकातवाडी हे गाव ‘माझं गाव कवितांचे गाव’ करण्याचा संकल्प विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालयाच्या वतीने ...
सातारा : शहराच्या जवळच असलेले जकातवाडी हे गाव ‘माझं गाव कवितांचे गाव’ करण्याचा संकल्प विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालयाच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी राज्यभरातील चित्रकारांना गावातील भिंतींवर कविता रेखाटण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, काही नामवंत चित्रकारांनी या गावातील भिंतीवर कविता रेखाटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच जकातवाडीची ओळख ‘माझं गाव कवितांचे गाव’ म्हणून होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील भिलार हे गाव ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. त्याप्रमाणेच जकातवाडी हे गाव ‘कवितांचे गाव’ करण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता. त्यानुसार या गावात काही प्रमाणात काम सुरू होते. सुरुवातीच्या काळात लोखंडी फ्रेम तयार करून त्यावर कविता लावण्याचे नियोजन होते. मात्र, ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील भिंतीवरच कविता रेखाटण्याचे नियोजन करण्यात आले. गावकऱ्यांनीही त्याला संमती दर्शविली आणि नुकतेच याठिकाणी घरांच्या भिंतीवर कविता रेखाटण्यास सुरुवात झाली. ज्या घरांवर कविता रेखाटली जात आहे, ते घरच या कवितांची काळजी घेणार आहे. त्यामुळे गावकºयांच्या सहभागातूनच हे कवितांचे गाव उभे राहत आहे. या उपक्रमासाठी विद्यावर्धिनी सार्वजनिक ग्राम वाचनालय, ग्रामपंचायत जकातवाडी, गावातील सांस्कृतिक मंडळे यांचे प्रयत्न सुरू आहेत. गावामध्ये अनेक निवांतपणे थांबण्यासारखी ठिकाणे आहेत. मोठी वडाची झाडे आहेत, ज्याठिकाणी वाटसरू निवांत बसू शकतात. त्या ठिकाणीही कविता लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गावातील पाणवठे, बसस्थानक, शाळा आणि मंदिर तसेच ग्रामपंचायतीच्या इमारती आणि सार्वजनिक ठिकाणी या कविता रंगविण्यात येत आहेत. त्याबरोबरच येथील सार्वजनिक ग्राम वाचनालयामध्ये प्रत्येक कवीची विविध पुस्तके वाचण्यासाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘कवितांचे गाव’ करण्याचा संकल्प केला होता. त्याला सर्वांची साथ मिळाली. त्यामुळे आता गावातील प्रत्येक घरावर कविता रेखाटण्याचे काम सुरू झाले आहे. जकातवाडी हे कवितांचे गाव होणार म्हणून समाधान आहे.
- प्रल्हाद पार्टे, अध्यक्ष, सार्वजनिक ग्रामवाचनालय, जकातवाडी