पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता राहणार बंद; दुरुस्तीची कामे सुरु असल्याने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 10:38 PM2022-07-13T22:38:28+5:302022-07-13T22:40:01+5:30
या ठिकाणी सध्या दुरुस्तीची कामे प्रगतीत आहेत.
महाबळेश्वर : पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता प्रतापगड फाटा ते मेटतळे घाट दुरुस्तीच्या अनुषंगाने रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाबळेश्वर बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांनी सांगितले. महाबळेश्वरमध्ये २०२१ च्या जुलैमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे तसेच नदीपात्रातून, ओढ्यांच्या पात्रांतून मोठ्या प्रमाणात दगड-मातीसदृश साहित्य रस्त्यावर येऊन जागोजागी रस्त्यावरील मोऱ्यांची व रस्त्यांचे नुकसान झालेले होते.
या ठिकाणी सध्या दुरुस्तीची कामे प्रगतीत आहेत. या ठिकाणी पाइप टाकणे व ओढ्याच्या पात्रातील दगड-धोंडे काढणे, तसेच डोंगर भागाकडील सुटला दगड-मातीचा भाग काढणे याकरिता दि. १४ जुलै रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या काळात संध्याकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यंत आंबेनळी घाट बंद करावा, अशी मागणीही बांधकाम विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळवले असल्याचे महाबळेश्वर बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांनी सांगितले.