गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:46 AM2021-09-10T04:46:25+5:302021-09-10T04:46:25+5:30
सध्या कोरोनाचे संकट आटोक्यात आल्याने कऱ्हाड शहर व परिसरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अनेक ...
सध्या कोरोनाचे संकट आटोक्यात आल्याने कऱ्हाड शहर व परिसरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील अनेक गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे. दरम्यान, कऱ्हाड शहर व तालुक्यात गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनीही गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार करून त्यांना उत्सव काळात हद्दपार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्या उपविभागातील ३१ जण तडीपार आहेत. मात्र काही गुन्ह्यातील संशयित जामिनावर बाहेर आले आहेत. अशांवर कारवाईची टांगती तलवार आहे. शिवाय अवैध व्यावसायिक, किरकोळ गुन्ह्यातील संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रियाही सुरू आहे. कऱ्हाड शहर व तालुका पोलिसांची रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर करडी नजर असून, त्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखाही कामाला लागली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, पोलीस निरीक्षक खोबरे यांनी मंडळांंसह ग्रामस्थांच्या बैठका घेऊन गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सूचना केल्या आहेत.