खंड्या धाराशिवकरच्या टोळीला पोलिसांनी लावला मोक्का !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 10:59 PM2017-08-11T22:59:23+5:302017-08-11T22:59:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : खून, मारामारी, दरोडा आणि खासगी सावकारीचे तब्बल २२ गुन्हे दाखल असलेला प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर (वय ३५, रा. न्यु विकासनगर खेड, सातारा) याच्यासह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सर्वसामान्य लोकांना खासगी सावकारीद्वारे दहशत निर्माण करून खंड्याने टोळी तयार केली होती. या टोळीच्या माध्यमातून खंड्याने अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पीडित गरजू लोकांना अनाधिकृतपणे व्याजाने पैसे देऊन जबरदस्तीने त्यांची मालमत्ता हडप करत होता. त्याची वाढती दहशत पाहता त्याच्यावर कडक करवाई व्हावी, यासाठी पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी खंड्यासह त्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी, असा प्रस्ताप पाठविला होता.
अधीक्षक संदीप पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता.
या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, खंड्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
खंड्याने नागरिकांकडून जबरदस्तीने घेतलेल्या जमिनी, फ्लॅट, दुचाकी आणि चारचाकी वाहने आदी मालमत्तेचीही पोलिस कसून चौकशी करणार आहेत.
गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेप किंवा फाशी
संघटित गुन्हेगारीला मोक्का असे म्हणतात. या खटल्याची सुनावणी पुणे येथील मोक्का न्यायालयात सुरू होणार आहे. मोक्का गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत आरोपी कारागृहातच
असतात.
उच्च न्यायालयामध्ये आरोपींना जामिनासाठी अर्ज करण्याची संधी असते. मात्र, बहुतांश खटल्यात आरोपींचा जामीन फेटाळला गेला आहे. हा मोक्का गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मेठप किंवा फाशीची शिक्षा कायद्यामध्ये तरतूद आहे.
खंड्याच्या टोळीचा तपास उपविभागीय अधिकारी खंडेराव धरणे करणार असून, तपास पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील न्यायालयात ते दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.