कोरेगावात पोलीस धरत्याती... ३५ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:34+5:302021-05-14T04:39:34+5:30
कोरेगाव : लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेल्या लोकांना आता सकाळी किंवा सायंकाळी बाहेर फिरणे देखील अवघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ...
कोरेगाव : लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेल्या लोकांना आता सकाळी किंवा सायंकाळी बाहेर फिरणे देखील अवघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी तातडीने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एकाच दिवसात कोरेगाव पोलिसांनी थोडाथोडका नव्हे, तर ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करत २३ दुचाकी क्वारंटाईन केल्या आहेत. एकूणच मॉर्निंग नको अन् इव्हिनिंग वॉक बी नको, कोरेगावात पोलीस धरत्याती... अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
कोरेगाव तालुक्यात प्रशासनाने कठोर कारवाई करूनसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे आता नरमाईची भूमिका न घेता, अत्यंत कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी घेतली आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व नगरपंचायतीच्या
मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तातडीने बुधवारी सायंकाळीच कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली सहायक उपनिरीक्षक महादेव खुडे, रेखा गायकवाड, जास्मीन पटेल, पूनम वाघ, पोलीस जवान किशोर भोसले, समाधान गाढवे, प्रमोद जाधव, अतुल कणसे, अमोल कणसे, प्रशांत लोहार, अजित पिंगळे यांच्यासह गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक अधिक बर्गे व त्यांच्या जवानांनी बुधवारी सायंकाळी तडवळे रस्त्यावर इव्हिनिंग वॉकला गेलेल्यांवर कारवाई केली.
पोलीस आल्याचे पाहून अनेकांनी रस्त्यालगतच्या बांधाबांधाने पळ काढला. त्यामध्ये नामांकित लोकांचा पण समावेश होता. रात्री उशिरापर्यंत दंडात्मक कारवाईचे कामकाज सुरूच होते. गुरुवारी सकाळी अनेकजण मोठ्या जोशात मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. पोलिसांनी तडवळे रस्त्याकडे मोर्चा न वळविता, थेट कठापूर रस्त्यावर धाव घेतली आणि तेथे अनेकांची धरपकड केली. तेथेसुद्धा अनेकांची पाचावर धारण बसली. क्रिकेट खेळणाऱ्यांवर देखील कारवाई केली गेली. बुधवारी आणि गुरुवारी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये २३ दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे तब्बल ३५ हजार रुपयांचा दंड वसूल
केला आहे.
चौकट :
स्वत:ला धोक्यात घालू नका. कोरेगावात कोरोनाचा वेग जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण
घराबाहेर पडणे चुकीचे आहे. मॉर्निंग काय किंवा इव्हिनिंग वॉक काय, थोडे दिवस थांबवा, शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे पोलीस कारवाईही करणारच आहे. नागरिकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी केले आहे.