शिक्षकांच्या सभेत पोलीस बनले हेडमास्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:37 PM2018-09-16T22:37:42+5:302018-09-16T22:37:46+5:30
सातारा : सांगली येथील शिक्षक बँकेच्या सभेत गुरुजनांनी जो
धुडघूस घातला तसा साताऱ्यातील सभेत दंगा होऊ नये म्हणून सभेची सूत्रे पोलिसांनी हाती घेतल्याचे दिसून आले. गोंधळ घालणाºया गुरुजनांना अखेर पोलिसांनाच शांत करावे लागले. एकंदरीत या सभेत पोलीस हेडमास्टर बनले असले तरी सभा संपेपर्यंत गुरुजनांनी केलेला केवळ गोंधळ अन् गोंधळच अनुभवयास आला.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७१ वी वार्षिक सभा साताºयातील पुष्कर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार शेट्टे यांनी विषय वाचनाला सुरुवात केली. पहिला विषय वाचल्यानंतर शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे हे बोलण्यास उभे राहिले. ‘आम्हाला मान्य नाही. पहिले व्याजदर कमी करा,’ अशी त्यांनी मागणी
करताच समितीचे इतर सदस्यही आपल्या जागेवरून उठले. त्यानंतर प्रचंड गोंधळास सुरुवात झाली. चेअरमन राजेंद्र घोरपडे हे ‘खाली बसा, खाली बसा,’ अशी विनंती करून थकले.
‘एवढी थकबाकी कोणाची, ४० लाखांचे कर्ज कोणाला दिले?, रिबेट योजना नक्की काय? असे घोषवाक्य लिहिलेले फलक समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात उंचावून धरत सत्ताधाºयांचा निषेध नोंदविण्यास सुरुवात केली. ‘समितीचा विजय असो, संघाचा मुर्दाबाद’ अशा घोषणा सुरू झाल्या. त्यामुळे व्यासपीठावरून कोण काय बोलत आहे, कोणालाही समजत नव्हतं. संपूर्ण कार्यालयात केवळ गोंधळ अन् गोंधळच ऐकायला येत होता.
बँकेचे चेअरमन घोरपडे व माजी व्हाईस चेअरमन मोहन निकम हे वारंवार सभासदांना खाली बसा, तुमच्या प्रश्नांना उत्तर दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही, असे सांगत होते. परंतु गोंधळ थांबता थांबत नव्हता. व्यासपीठावरील संचालकांनी विषय वाचनाबरोबरच ठराव मांडण्यास सुरुवात केली. ठराव मांडताच संघाचे सभासद मंजूरचा नारा देत होते. तर समितीचे सभासद नामंजूरचा नारा देत होते.
सभेची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच चेअरमन घोरपडे यांनी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना विनंती करताच त्यांनी माईक हातात घेतला. सारंगकर म्हणाले, ‘गुरुजन हो.. तुम्हाला प्रश्न विचारण्याकरिता माईक हातात दिला जाईल; पण तुम्ही खाली बसून घ्या, गोंधळ घालू नका,’ अशी विनंती केली. तेव्हा समितीचे कार्यकर्ते खाली बसले.
व्यासपीठावर चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी चिठ्ठीवर आलेले प्रश्न वाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा शिक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. समितीच्या सभासदांची घोषणाबाजी सुरू असतानाच उपाध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी सभा संपल्याचे जाहीर करत वंदे मातरम्ला सुरुवात केली. केवळ अर्ध्या तासात सभा गोंधळातच पार पडली.
जेवतानाही शूटिंग...
शिक्षक सभा प्रचंड गोंधळताच पार पडली. या सभेचे पोलिसांसह बँकेच्या सत्ताधाºयांनीही व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. एवढेच नव्हे तर सभा संपल्यानंतर जेवणासाठी कोण कोण आले आहे, याची माहिती असावी म्हणून जेवणारांचेही व्हिडीओ शूटींग करण्यात आल्याचे दिसून आले.
व्यासपीठाला बांबूचे बॅरिकेट्स..
यापूर्वी झालेल्या शिक्षक बँकेच्या सभेत खुर्च्या फेकून हाणामारी झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या होत्या. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या सभेला प्रचंड खबरदारी घेण्यात आली होती. व्यासपीठावर कोणी येऊ नये म्हणून समोरून बांबूचे बॅरिकेट्स लावण्यात आले होते. व्यासपीठ आणि शिक्षक सदस्य यांच्यात सात फुटांचे अंतर ठेवण्यात आले होते. बसण्यासाठी कोणालाही खुर्ची दिली गेली नाही. सतरंजीवर सर्वजण बैठक मांडून बसले होते.