वृद्धेसाठी पोलीसच बनले ‘देवदूत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:16+5:302021-05-24T04:37:16+5:30
कऱ्हाडात घडलेल्या या घटनेने कायदा-सुव्यवस्थेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची समाजाप्रति असलेली निष्ठाही अधोरेखित झाली आहे. शनिवारी रात्री शहर पोलीस ...
कऱ्हाडात घडलेल्या या घटनेने कायदा-सुव्यवस्थेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची समाजाप्रति असलेली निष्ठाही अधोरेखित झाली आहे. शनिवारी रात्री शहर पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक विजय गोडसे रात्रगस्त अधिकारी होते, तर हवालदार खलील इनामदार पेट्रोलिंग अंमलदार होते. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हवालदार खलील इनामदार हे शासकीय वाहनचालक संग्राम पाटील यांच्यासह पोलीस ठाण्यातून रात्रगस्तीसाठी बाहेर पडले. कोल्हापूर नाक्यावरून ते वारूंजी फाट्याकडे जात असताना कोयना नदीच्या पुलावर त्यांना एक वृद्धा उभी असलेली दिसली. संग्राम पाटील यांनी वाहन थांबविले. त्यांनी त्या वृद्धेला हाक दिली. मात्र, वृद्धा त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. ती पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. अखेर हवालदार इनामदार यांनी वृद्धेशी संवाद साधत तिला पुलावरून बाजूला घेतले. शासकीय वाहनातून पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी ती वृद्धा वारुंजी फाट्यापासून पुलापर्यंत चालत आली असल्याचे व आजाराला कंटाळून आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचे पोलिसांना समजले.
वृद्धेला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिच्याशी चर्चा केली. त्यावेळी आजाराला कंटाळून आत्महत्या करणार होते, असे तिने पोलिसांना सांगितले. अखेर हवालदार इनामदार व संग्राम पाटील यांनी वृद्धेच्या घरचा पत्ता घेऊन तिच्या कुटुंबीयांना उठवले. वृद्धेबाबतची माहिती देऊन सर्वांना पोलीस ठाण्यात आणले. तसेच वृद्धेला सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
- चौकट
आज्जी तुम्ही बऱ्या होणार..!
आजाराला कंटाळलेली वृद्धा हताश झाली होती, मात्र पोलिसांनी तिला धीर दिला. उपचारपद्धती बदलली आहे. कर्करोगावर उपचार आहेत. चांगले उपचार घेतले तर आज्जी तुम्ही नक्की बऱ्या व्हाल, असा विश्वास पोलिसांनी त्या वृद्धेला दिला. त्यावेळी वृद्धेलाही अश्रू अनावर झाले. कुटुंबीयांनाही पोलिसांनी संबंधित वृद्धेवर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्याची विनंती केली.