कऱ्हाड दक्षिणेत पोलिसांची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:05 AM2021-05-05T05:05:04+5:302021-05-05T05:05:04+5:30
पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजीव डांगे यांनी पाचवड फाटा ...
पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजीव डांगे यांनी पाचवड फाटा येथे विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर मंगळवारी दिवसभर कारवाईची मोहीम राबविली. यामध्ये २५ दुचाकी जमा करून घेण्यात आल्या. तसेच संबंधितांकडून दंडही वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या २६ जणांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई वाहतूक शाखेचे सहायक फौजदार भोईटे, कॉन्स्टेबल सपकाळ, आशिष पाटील, महिला पोलीस चव्हाण यांनी केली. पाचवड फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असल्याचे समाजात विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.
कऱ्हाड तालुक्यातील दक्षिण भागात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोरोनोचा वाढता प्रसार रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेकरिता नियमावली ठरवून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने ओंड, उंडाळे, नांदगाव, येळगाव, येवती परिसरातील बहुतांशी गावांमध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. किराणा दुकानदारांनी फक्त होम डिलिव्हरी द्यायची आहे. या आदेशाचे पालन गावागावात केले जात आहे.
फोटो : ०४केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाड दक्षिणेतील प्रमुख रस्त्यांवर लॉकडाऊनमुळे मंगळवारी दिवसभर शुकशुकाट दिसत होता. (छाया : ज्ञानेश्वर शेवाळे)