पळून गेलेल्या शिक्षकाला पोलिसांनी घरात पकडले
By admin | Published: July 1, 2017 05:11 PM2017-07-01T17:11:14+5:302017-07-01T17:11:14+5:30
बदली केल्याच्या रागाने केली होती मारहाण
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. 0१ : येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक कमलाकर महामुनी यांना मारहाण केल्यानंतर रुग्णालयातून पळून गेलेल्या उपशिक्षक महेशकुमार शिंदे यांना शहर पोलिसांनी घरातून मध्यरात्री पकडले.
जिल्ह्याबाहेर बदली केल्याच्या राग मनात धरून उपशिक्षक शिंदे यांनी मुख्याध्यापक महामुनी यांच्या डोक्यात फ्लॉवरपॉट मारला. त्यानंतर स्मृतीचिन्ह आणि इतर साहित्याची तोडफोड केली. वादावादीचा हा प्रकार इतर शिक्षकांना समजल्यानंतर सगळ्यांनी मुख्याध्यापकांच्या दालनात धाव घेतली. त्यावेळी उपशिक्षक महेशकुमार शिंदे यांनी छातीत दुखत असल्याचे इतर शिक्षकांना सांगितले. त्यामुळे वेळ न दवडता शिक्षकांनी महेशकुमार शिंदे यांना तत्काळ शाळेपासून जवळच असलेल्या एका खासगी दवाखान्यात दाखल केले. हा प्रकार शहर पोलिसांना समजल्यानंतर शिंदेला अटक करण्यासाठी पोलिस रुग्णालयात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शिंदे यांनी तेथून धूूम ठोकली. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन शिंदेना अटक केली. परंतु शिंदेंनी पुन्हा माज्या छातीत दुखत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले. या ठिकाणाहून पुन्हा पळून जाऊ नये म्हणून दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दुपारी तीनच्या सुमारा त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.